30 हजार रोपांचे होतेय संवर्धन
प्रतिनिधी / बेळगाव
राणी चन्नम्मानगर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरीला ग्रामीण विकास पंचायत राजच्या आयुक्त शिल्पा नाग यांनी गुरुवारी भेट दिली. या नर्सरीतील रोपवाटिकेमध्ये तब्बल 30 हजार रोपांची उपज केली जात आहे. दरवषी सामाजिक वनीकरण विभागामार्फत ग्रामीण भागातील विविध रस्त्यांवर आणि इतर ठिकाणी वृक्षारोपण केले जाते. याकरिता आताच रोपवाटिकेत रोपे तयार करण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. या नर्सरीला आयुक्त शिल्पा नाग यांनी भेट देऊन सामाजिक वनीकरण विभागाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या नर्सरीमध्ये फणस, जांभूळ, आंबा, पिंपळ, कढीपत्ता, ताड, बेहडा, कडूलिंब, बदाम आदी रोपे जोपासली जाणार आहेत. येत्या पावसाळय़ात या रोपांची लागवड होणार आहे. याकरिता आताच नर्सरीत विविध जातीची रोपे संवर्धन करण्याचे काम खात्यामार्फत केले जात आहे. यंदा सामाजिक वनीकरण विभागाने ग्रामीण भागातील संपर्क रस्ते, खुल्या जागा आणि इतर सरकारी जागेत 30 हजारहून अधिक रोपांची लागवड केली आहे. दरम्यान, यंदा शेवटच्या टप्प्यात पावसानेदेखील साथ दिल्याने रोपे सुस्थितीत असल्याची माहिती देखील खात्याने दिली आहे. यावेळी डीसीएफ शिवानंद नाईकवाडी, एसीएफ एम. के. पाथरुट, आरएफओ प्रशांत जैन यासह नर्सरीतील कर्मचारी उपस्थित होते.