ओल्या कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी मनपावतीने हॉटेल व्यावसायिक-नागरिकांना मार्गदर्शन
प्रतिनिधी / बेळगाव
घरी किंवा हॉटेलमध्ये निर्माण होणाऱया ओल्या कचऱयावर प्रक्रिया कशी करावी, याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली. छोटय़ा आणि मोठय़ा आकाराचे डस्टबिन ठेवून प्रक्रिया करण्याबाबतचे मार्गदर्शन हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांना करण्यात आले. घरगुती कचऱयापासून आपल्या गार्डनकरिता सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येऊ शकते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
हॉटेलमध्ये उत्पन्न होणाऱया कचऱयाची विल्हेवाट व्यवस्थापन मंडळाने लावावी, अशी सूचना महापालिकेने केली आहे. पण याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. मात्र, कचऱयावर प्रक्रिया कशी करावी, याची माहिती हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांना देण्यासाठी मार्गदर्शन शिबिर सोमवारी महापालिकेत आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कचऱयापासून खत निर्मिती करण्याबाबतची माहिती देण्यात आली. ग्रीनरिच कंपनीच्या डस्टबिनची माहिती यावेळी सादर करून वेगवेगळय़ा स्वरुपात असलेल्या डस्टबिनची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली. दररोजचा कचरा रस्त्यावर टाकला जातो किंवा महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांकडे देण्यात येतो. कचरा देण्यासाठी प्रति महिना 40 रुपये द्यावे लागतात. पण या कचऱयापासून खत निर्मिती करून आपले पैसे आणि पर्यावरणही वाचविता येते. घरगुती वापरासाठी 20 किलोचे डस्टबिन घरी ठेऊन त्यामध्ये दररोजचा ओला कचरा टाकायचा. त्यावर मायक्रोब्स लिक्विडची फवारणी करायची. घरातील एक महिन्याचा कचरा साठविण्याची क्षमता डस्टबिनची आहे. एक महिन्यानंतर हा डस्टबिन बाजूला ठेवायचा. त्यानंतर कंपनीने दिलेल्या दुसऱया डस्टबिनचा वापर करायचा. दर दहा दिवसांनी डस्टबिनमध्ये साचलेले पाणी काढायचे. अशी प्रक्रिया केल्यानंतर 30 दिवसांनंतर 8 ते 9 किलो खत मिळू शकते. या खताचा वापर गार्डनसाठी किंवा शेतीमध्ये पिकासाठी होऊ शकतो. दहा दिवसांनी काढण्यात आलेल्या पाण्याचा वापरदेखील पिकांसाठी खत म्हणून वापरू शकतो, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.
मायक्रोब्सकरिता महिन्याला 150 रुपये खर्च
घरात ठेवण्यासाठी छोटय़ा आकारात व अपार्टमेंट, हॉटेलकरिता मोठय़ा आकारात डस्टबिन उपलब्ध आहेत. मायक्रोब्सकरिता महिन्याला 150 रुपये खर्च येतो. मात्र घरातील कचऱयापासून सेंद्रिय खत मिळू शकते. डस्टबिनचा वापर हॉटेल व्यावसायिक व अपार्टमेंटकरिता सोयीचा आहे. त्यामुळे याचा वापर करण्यास काहीच हरकत नाही, अशी माहिती प्रतिनिधींनी दिली.
यावेळी उपस्थित हॉटेल व्यावसायिक, नागरिक, स्वच्छता निरीक्षक आणि मनपाच्या अधिकाऱयांनी विविध प्रश्न उपस्थित करून शंकांचे निरसन करून घेतले. हॉटेल व्यावसायिकांसाठी किंवा ओला कचरा मोठय़ा प्रमाणात उत्पन्न होत असलेल्या व्यावसायिकांनी कचऱयावर प्रक्रिया करण्यास या डस्टबिनचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने अधिकाऱयांनी केले.
यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते महांतेश नरसण्णावर, पर्यावरण साहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.