वार्ताहर /सांबरा
घराचे रंगकाम करतेवेळी केवळ सात फूट उंचीवरून तोल जाऊन पडल्याने एका तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना निलजी येथे घडली. बाळाराम रामचंद्र पाटील (वय 40, रा. लक्ष्मी गल्ली निलजी) असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मंगळवार दि. 29 रोजी दुपारी 1ः30 वाजता मोदगा येथे ही घटना घडली.
अपघात घडताक्षणीच बाळाराम पाटील यांना त्वरित निर्मलनगर येथील हॉस्पिटल येथे नेण्यात आले. पण डोक्मयाला जबर मार बसल्याने त्यांना बेळगाव येथील विजय हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. परंतू उपचाराचा कोणताच फायदा न झाल्याने बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, एक बहीण, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अतिशय मनमिळावू व लाघवी वृत्तीच्या बाळाराम पाटील यांनी निलजी व परिसरातील अनेक सार्वजनिक कामे मोबदला न घेता केली होती. त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी आठ वाजता होणार आहे.