मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : महिन्याभरात सुरु होणार खास ऍप,बेती आऊट पोस्टच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
प्रतिनिधी /पर्वरी
गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने मोठय़ा प्रमाणात लोक येत असतात. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचाही समावेश असतो. हे परप्रांतीय गुन्हेगार आपला फसवणुकीचा धंदा करण्यासाठी गोव्यात येतात. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात गुन्हे घडतात. परप्रांतीयांना भाडय़ाने खोली देताना किंवा अन्य कसलाही व्यवहार करताना योग्य दक्षता घेतली पाहिजे. आता घरबसल्या ऑनलाईन तक्रारी नोंदविण्याकरिता महिन्याभरात ‘गोवा पोलीस डिजिटल ऍप’ सुरु करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.
काल बुधवारी बेती येथील पोलीस आउटपोस्टचे लोकार्पण करताना ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस महासंचालक जसपाल सिंग, पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग, अधीक्षक शोभित सक्सेना, आमदार केदार नाईक, रेईश मागुशच्या सरपंच सुश्मिता पेडणेकर, सांगोल्डाच्या सरपंच नीता कांदोळकर, नेरुलचे सरपंच सुदेश गोवेकर, पिळर्ण-मार्राच्या सरपंच रेश्मा बांदोडकर, जि. पं. सदस्य संदीप बांदोडकर, चारही ग्राम पंचायतीचे उपसरपंच, पंच सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. साळगावचे आमदार केदार नाईक यांच्या वाढदिनानिमित्त या आउट पोस्टचे उद्घाटन करण्यात आले.
गुन्हे न घडण्यासाठी दक्ष रहावे
दिवसेंदिवस पोलीस खात्याची कार्य करण्याची क्षमता वाढत आहे. आता गुन्हेगार नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करतात, आणि लोक त्यांना बळी पडतात आणि फसले जातात. पोलीस तपासयंत्रणा चांगल्याप्रकारे काम करते आहे. गुन्हय़ांचा तपास उत्तमप्रकारे केला जातो. परंतु मुळात गुन्हे घडूच नयेत म्हणून लोकांनी दक्ष राहणे जरुरीचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्थानिकांनी पोलिसांना मदत करावी
गोव्याबाहेरील अनेक लोक आपला फसवणुकीचा धंदा चालू करण्यासाठी गोव्यात येतात. त्यामुळे स्थानिक लोकांनी जागरूक राहण्याची खरी गरज आहे. गोवा पोलीस खूप चांगली कामगिरी करतात. अन्य राज्याच्या तुलनेने येथे गुन्हय़ांचा छडा लावण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. नागरिकांनीही पोलिसाना गुन्हय़ांचा छडा लावण्यासाठी मदत केली पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
घरबसल्या करता येईल तक्रार
आगामी काळात ऑनलाईन तक्रारी नोंदविण्याकरिता डिजिटल ऍप सुरु करण्यात येणार आहे. म्हणजे लोकांना पोलीस स्थानकात यायची किंवा हेलपाटे घालण्याची गरज नाही. घरबसल्या तक्रार नोंदण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
आऊटपोस्टवर सर्व कामकाज होईल
गोवा मुक्तीसाठी स्वातंत्र्यसेनानी मोहन रानडे आणि त्यांच्या सहकाऱयांनी बेती येथील पोलीस आउटपोस्टवर हल्ला केला होता. गेली कित्येक वर्षे या आउट पोस्टची नवीन वास्तू करण्याचे काम रखडले होते. आज पंचायतीच्या सहकार्याने आणि गोवा राज्य साधनसुविधा मंडळाच्या अधिकाऱयांच्या मेहनतीने हे आउट पोस्ट उभे झाले आहे. जरी हे आउट पोस्ट असले तरी पोलीस स्थानकाप्रमाणेच येथे कामकाज चालू राहील.
येथून सार्वजनिक पोलीस कार्य, वाहतूक व्यवस्था, जनतेची सेवा अशी सर्वप्रकारची कामे या आउटपोस्टमधून केली जातील. पोलीस जनतेचे मित्र आहेत. ते जनतेला सदैव चांगली सेवा देतील, अशी मला खात्री आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी पोलीस महासंचालक जसपाल सिंग, पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग, उत्तर गोवा अधीक्षक शोभित सक्सेना, आमदार केदार नाईक यांनी आपले विचार मांडले.