डॉ. सिद्धराम महास्वामींचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाकाळात आपण आपली काळजी घेऊन नियमांचे पालन करून कोरोनापासून दूर राहुया. विनाकारण घाबरून जाऊन हॉस्पिटलमध्ये गर्दी करण्याचे टाळूया. संयम हा या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण सर्वजण त्याचे पालन करूया, असे आवाहन डंबळ गदग येथील डॉ. सिद्धराम महास्वामी यांनी केले आहे.
गदग येथील मठाद्वारे त्यांनी आवाहन प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सततच्या वैद्यकीय संशोधनामध्ये को-व्हॅक्सिन व कोविशिल्ड लस उपलब्ध करण्यात यशस्वी झालो आहोत. सर्वांनी न चुकता लस घ्यावी, प्रतिकारशक्ती वाढेल असा आहार घ्यावा, व्यसनापासून दूर रहावे, असेही त्यांनी सांगितले आहे.
स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून, सतत हात धुवून घ्या, सॅनिटायझरचा वापर करा, सामाजिक अंतर राखा, अगदी महत्त्वाच्या कारणाशिवाय बाहेर पडू नका. घाबरल्याने ताण वाढून त्याचा शरीरावर परिणाम होतो. विनाकारण घाबरून हॉस्पिटलमध्ये गर्दी करण्याऐवजी जे खरोखरच गंभीर आजारी आहेत त्यांच्यासाठीच हॉस्पिटल खुली ठेवूया. आपण जागृत राहिल्याने कोरोनापासून दूर राहू शकतो, असेही स्वामींनी म्हटले आहे.