सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचे प्रा. महेंद्र नाटेकर यांचा निवेदनाद्वारे इशारा
प्रतिनिधी / कणकवली:
घोटगे – सोनवडे घाटमार्गाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे या मागणीसाठी सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीच्यावतीने 25 फेब्रुवारी रोजी महामार्गावर पणदूर तिठा येथे रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना देण्यात आले.
सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी सत्यवान ढवळ, विलास ढवळ, तुळशीदास कालेकर, पी. बी. पाटील उपस्थित होते. या घाटमार्गासाठी गेली 40 वर्षे लढा देण्यात आला आहे. आता या घाटमार्गासाठीचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. केवळ निविदा प्रक्रिया व्हावयाची आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत दिरंगाई करत असल्याने आंदोलनाशिवाय पर्याय नाही. घाटमार्ग संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन केल्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही. या घाटमार्गातील वन्यजीव खात्याची परवानगी, पर्यायी वनजमीन, पर्यावरण दाखला आदी सर्व अडथळे दूर झाले आहेत. सरकारने घाटमार्गासाठी निधीही मंजूर केला आहे. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे काम थांबले आहे. त्यामुळे हे काम तातडीने सुरू न झाल्यास रास्तारोकोचा इशारा देण्यात आला आहे. wBD