प्रत्यार्पणासाठी भारत अँटिग्वा-बारबूडाच्या संपर्कात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळय़ातील आरोपी आणि फरारी व्यावसायिक मेहुल चोक्सी क्युबा येथून पळून जात असताना डोमिनिकाला जाताना पकडला गेला. 13 हजार 500 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळय़ातील आरोपी मेहुल चोक्सी 23 मे रोजी अँटिग्वा आणि बारबुडाहून फरार झाला होता. आता त्याला भारतात पाठविण्यासाठी अँटिग्वा आणि बारबूडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी सहमती दर्शवली आहे. मेहुल चोक्सीला अँटिग्वा आणि बारबूडाला न पाठवता सरळ भारताच्या स्वाधीन करावे, अशी सूचना गॅस्टन ब्राऊन यांनी डोमिनिकाला केली आहे.
मेहुल चोक्सी याच्याकडे अँटिग्वाचे नागरिकत्व आहे. मात्र त्याच्यावरील गंभीर आरोपांमुळे त्रस्त अँटिग्वा सरकारने डोमिनिकाला थेट भारताकडे देण्याची विनंती केली आहे. असे झाल्यास मेहुल चोक्सी याचे नीरव मोदीच्या आधी भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकते. फरार उद्योजक मेहुल चोक्सी 23 मे रोजी संध्याकाळी अँटिग्वामधील त्याच्या घरातून बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्या बेपत्ता झाल्याचा अहवालही नोंदविला गेला. तथापि, त्याच्या परिचयातील व्यक्तीने तो क्युबामध्ये फरार झाल्याचे सांगितले होते. मेहुल चोक्सीकडे सध्या अँटिग्वाचे नागरिकत्व असून तो सुटण्यासाठी धावपळ करीत होता, परंतु डोमिनिकाला पोहोचताच पोलीस अधिकाऱयांनी त्याला पकडले.
मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये ताब्यात घेतल्यापासून भारतीय तपास यंत्रणा आणि अधिकारी त्याला भारतात परत आणण्यासाठी पर्याय शोधत आहेत. इंटरपोलमधून मेहुल चोक्सीच्या अटकेची माहितीही सीबीआयला मिळाली आहे. इंटरपोलच्या वतीने मेहुल चोक्सीविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आल्यामुळे डोमिनिका सरकार मेहुलला थेट भारताकडे सोपवू शकते. या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही, असा दावा सध्या केला जात आहे.
कायदेशीर तरतुदीनुसार होणार प्रत्यार्पण
अँटिग्वा सरकारने डोमिनिका सरकारला मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवण्याची विनंती यापूर्वीच केली आहे. अशा परिस्थितीत कायदेशीर तरतूद नीटपणे वापरली गेली तर फरार मेहुल चोक्सीची जबाबदारी अँटिग्वावर सोपविली जाईल. त्यानंतर चोक्सीचे भारतात प्रत्यार्पण केले जाईल, असा अंदाजही वर्तवला जात आहे. आतापर्यंत मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या दोन्ही आरोपींच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न केला जात आहे. नीरव मोदी ब्रिटनच्या तुरुंगात असून गृह मंत्रालयाने त्यांच्या प्रत्यार्पणास मान्यता दिली आहे. मात्र, याविरोधात नीरव मोदीने उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या रखडलेली आहे.
सहकार्याची तयारी…
आमचा देश आता मेहुल चोक्सीला स्वीकारणार नाही. त्याने या बेटावरून फरार होत खूप मोठी चूक केली आहे. डोमिनिकाचे सरकार आम्हाला सहकार्य करत असून योग्य प्रक्रिया पूर्ण होताच त्याला भारताच्या स्वाधीन केले जाईल.
– गॅस्टन ब्राऊन, अँटिग्वा पंतप्रधान