चंदुर / वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे काल दि. 2 आक्टोंबर रोजी रात्री एका 32 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. शाहूनगर भागात राहणाऱ्या या तरुणाचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. घरचा संसार सुरळीत होता. आणि अचानक त्या तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटना समजताच शेजारील नागरिक, पोलीस पाटील घटनास्थळी धावले. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस आल्यानंतर प्रथमदर्शी त्या युवकाचा मोबाईल तपासण्यात आला. त्याने नेहा शर्मा नामक युवती बरोबर ऑनलाइन चॅटिंग केल्याचे निदर्शनास आले. त्यासोबतच त्या युवतीने संबंधीत तरुणांबरोबर मैत्री जुळवत त्याला आपल्या जाळ्यात ओढले होते. आणि व्हिडिओ कॉलिंग करून अश्लील चाळे व हावभाव स्वतः करून त्यालाही करावयास सांगितले.
सर्व अश्लील प्रकाराचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले. त्यानंतर तो व्हिडिओ सार्वजनिकरीत्या प्रसारित करण्याची धमकी देते दहा हजार रुपयांची मागणी केली. यानंतर त्या युवकाला आपण हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची जाणीव झाली व यातूनच त्याने आत्महत्या केली. अशी प्रथमदर्शी माहिती समोर आली आहे. या आत्महत्येची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. याचा प्राथमिक तपास शिवाजीनगरचे पोलीस मोमीन यांनी केला. तर पुढील तपास हा विवेक कराडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलिसांनी अश्या प्रकाराला बळी न पडता कायद्याची मदत घ्यावी असे आवाहन केले आहे.