जम्मू काश्मीरमध्ये संघर्षनाटय़ सुरूच : आठवडय़ात 9 दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील श्रीनगर जिल्हय़ातील पंथा चौकात गुरुवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. या चकमकीत चार जवान जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संघर्षनाटय़ घडलेले ठिकाण श्रीनगर शहराच्या लगतच आहे.
पांथा चौकातील एका घरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे जम्मू-काश्मीर पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. गेल्या आठवडय़ाभरात जम्मू काश्मीरमध्ये जवानांनी नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुलगाम व अनंतनाग या जिह्यात या चकमकी झाल्या असून यात एक जवान हुतात्मा झाला होता.
पोलिसांच्या बसवरील हल्ल्यात सहभाग
चकमकीत ठार झालेल्यांपैकी एका दहशतवाद्याचा 13 डिसेंबरला पोलिसांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सहभाग असल्याचे सखोल तपासाअंती स्पष्ट झाले. 13 डिसेंबरला श्रीनगर जवळ पोलिसांच्या बसवर गोळीबार करून हल्लेखोर दहशतवादी फरार झाले होते. मृतांमधील एकाची ओळख पटली आहे. सुहैल अहमद असे त्या दहशतवाद्याचे नाव असून तो जैश-ए-मोहम्मद संघटनेचा आहे.