शास्त्रीनगर नववा क्रॉस येथील घटना : रात्री एकच्या सुमारास पडला दृष्टीस
बेळगाव / प्रतिनिधी
सर्वच साप विषारी असतात असे नाही, पण साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. त्याशिवाय प्रत्यक्ष सापाला पाहिलं की अनेकांची बोबडी देखील वळते. पंचवीस फुटी अजगर जर तुमच्या दृष्टीस पडला तर काय होईल. होय पंचवीस फुटी अजगर. हा अजगर जंगलात, वनात नाही तर चक्क बेळगाव येथील शास्त्रीनगर नववा क्रॉस येथे काही नागरिकांच्या दृष्टीस पडला. तोही गुरुवारी रात्री एकच्या सुमारास. यावेळी येथील रहिवाशांनी घराच्या समोर असलेला गटारीत हा अजगर पहिला. त्यावेळी सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.
अजगर साप हा घनदाट जंगलात व इतरत्र दिसतो. मात्र मानवी वस्तीत म्हणजेच शहरांमध्ये अशाप्रकारे अजगर दृष्टीस आल्यामुळे येथील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने अशाप्रकारे सरपटणाऱया प्राण्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवावे, अशी मागणी होत आहे.