वैभवनगर येथील घटना, फादरवर हल्ल्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
बॉक्साईट रोड, वैभवनगर येथील चर्चमध्ये तलवारधारी घुसल्याने एकच खळबळ माजली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून फादरवर हल्ल्याचा हा प्रयत्न होता का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तलवारधारीच्या वावराने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
सोमवार दि. 13 डिसेंबरपासून बेळगाव येथे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. पोलीस यंत्रणा सध्या अधिवेशन बंदोबस्तात आहे. याच संधीचा फायदा घेत बेळगावात गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून चोऱया, घरफोडय़ांचे सत्र सुरू आहे. शनिवारी चर्चमध्ये तलवारधारी घुसल्याचे उघडकीस आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
उपलब्ध माहितीनुसार दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास बॉक्साईट रोड, वैभवनगर येथील सेंट जोसेफ वर्कर चर्च येथे ही घटना घडली आहे. फादर फ्रान्सिस डिसोजा हे संभाव्य हल्ल्यातून बचावले आहेत. तातडीने एपीएमसी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत तलवारधारीचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजवरून त्या अगंतुकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी फादर फ्रान्सिस डिसोजा यांची भेट घेऊन घटनेसंबंधी माहिती घेतली आहे. तलवारधारी अगंतुक कोणत्या उद्देशाने चर्चमध्ये घुसला? फादरवर हल्ल्याचा उद्देश होता का? आदी प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दुपारी चर्चच्या पहिल्या मजल्यावरील स्टोअररुममध्ये हा अगंतुक फादरना दिसला. त्याने हालचाल करण्याआधीच फादर फ्रान्सिस यांनी प्रसंगावधान राखून स्वतःची सुटका करून घेतली. फादरना पाहून त्या अगंतुकानेही तेथून पलायन केले. चोरीच्या उद्देशाने चर्चमध्ये प्रवेश केला आहे का? असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बिशपनी दिली भेट या घटनेची माहिती मिळताच बेळगाव डायसचे बिशप डेरेक फर्नांडीस यांनी वैभवनगर येथील चर्चला भेट देऊन या संपूर्ण घटनेविषयी माहिती घेतली. त्यांनी अगंतुकाचा शोध घेण्यासंबंधी पोलीस अधिकाऱयांशीही चर्चा केली. यावेळी फादर नेल्सन पिंटो व इतर धर्मगुरु उपस्थित होते.