भाजप कार्यकर्त्यांना नड्डा यांचा आदेश
प्रतिनिधी /मडगाव
दक्षिण गोव्यातील बऱयाच मतदारसंघात भाजपच्या बुथ समित्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या नाहीत. निवडणूक जेमतेम दिड महिन्यावर येऊन ठेपलेली आहे. अशा वेळी बुथ समित्यांनी अधिक प्रभावी कार्य करणे जरूरीचे आहे. आत्ता आणखीन विलंब न लावता सर्वांनी पक्षाच्या कार्यात झोकून देण्याचा आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल मडगावात घेतलेल्या बैठकीत दिला.
ही बैठक दक्षिण गोव्यातील 20 मतदारसंघातील भाजप मंडळ प्रभारी, मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस, दक्षिण गोवा जिल्हा समिती, राज्य कार्यकारणी सदस्य, भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य यांच्यासाठी होती. या बैठकीत जवळपास 80 जणांची उपस्थिती होती. त्यात विशेष म्हणजे या बैठकीला भाजपच्या संभाव्य उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पक्षाचे महामंत्री सतीश धोंड, सरचिटणीस दामू नाईक व ऍड. नरेंद्र सावईकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भाजपची ताकद ही त्यांचे कार्यकर्ते असून कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून पक्षाला पुन्हा एकदा सत्तेवर आणण्यासाठी कंबर कसण्याचा सल्ला या बैठकीतून जे. पी. नड्डा यांनी दिला. दक्षिण गोव्यातील काही मतदारसंघात बुथ समित्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या नाही. त्यांच्या समस्या या बैठकीत जाणून घेतानाच पक्षाचे कार्य अशा पद्धतीने पुढे न्यावे यावर श्री. नड्डा यांनी मार्गदर्शन केले.
निवडणुकीसाठी जमतेम दिड महिन्याचा कालावधी बाकी आहे. पक्ष ज्यांना उमेदवारी देणार त्यांच्या सोबत राहून सर्वांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करावे असे आवाहन देखील श्री. नड्डा यांनी केले. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी देखील मार्गदर्शन केले.
30 डिसेंबर पर्यंत दक्षिण गोव्यातील 20 मतदारसंघात बुथ संपर्क अभियान व 1 जानेवारी पासून घर घर चलो अभियान राबविण्याचा आदेश देखील श्री. नड्डा यांनी या बैठकीत दिला. दिलेले टार्गेट पूर्ण करण्यास सांगण्यात आले.
भाजपच्या संभाव्य उमेदवारांची उपस्थित
दक्षिण गोव्यातील काही मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार जवळपास निश्चित केले असून त्यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते. त्यात वास्को मतदारसंघातून दाजी साळकर, फातोर्डा मतदारसंघातून दामू नाईक, मडगाव मतदारसंघातून डॉ. जगन्नाथ उर्फ देश प्रभुदेसाई, सांगेतून सुभाष फळदेसाई, काणकोण मतदारसंघातून रमेश तवडकर यांचा समावेश होता.