ऑनलाईन टीम / तरुण भारत
आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना सीबीआय कोर्टाने मोठा झटका दिला असुन चारा घोटाळाप्रकरणी दोषी ठरवत लालुंना पाच वर्षांचा कारावास तसेच 60 लाखाचा दंड ठोठावला आहे.रांची सीबीआय कोर्टचे विशेष न्यायाधीश एसके शशी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही शिक्षा सुनावली. यावेळी लालुंसह या प्रकरणात दोषी आढळलेल्या आणखी ३७ जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
१५ फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यांच्यासह ३८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. यानंतर लालू प्रसाद यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. लालू प्रसाद यांना उपचारासाठी तुरुंग प्रशासनाने रिम्समध्ये पाठवले होते. लालू प्रसाद हे रिम्स मधूनच कोर्टात उपस्थित होते. शिक्षा सुनावण्यापूर्वी सीबीआयने सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. बचाव पक्षाने किमान शिक्षेचा आग्रह धरला. रांची न्यायालय परिसरात बिहारमधूनही मोठ्या संख्येने आरजेडी नेते आणि कार्यकर्ते पोहोचले होते.