ऑनलाईन टीम / नागपूर :
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. नागपूर शहरात तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 24 तासात शहरात आजवरची सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून आली. बुधवारी 3,370 नवे कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. यात नागपूर शहरात 2668 तर नागपूर ग्रामीणमधील 699 रुग्ण आहेत.
दरम्यान, नागपूर शहरातील आजवरची ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. असे असले तरी कालच्या दिवसात 1,216 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर 16 जणांचा मृत्यू झाला. कालच्या दिवशी 15,000 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यामध्ये पॉजिटिव्ह टक्केवारी 22.5% इतकी जास्त आहे.
शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 78 हजार 756 वर पोहोचली असून सद्य स्थितीत 21,118 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यासोबतच 1,53,133 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 4,505 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.