येळ्ळूरच्या पालकांने मांडली कैफीयत, युक्रेनमध्ये अडकली विद्यार्थिनी, भारतात परतल्यावरच मिळणार दिलासा
गंगाधर पाटील / बेळगाव
उच्चशिक्षण घेऊन आपले, आपल्या घराण्याचे आणि गावचे नाव उज्ज्वल करेल यासाठी आपल्या मुलीला युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पाठविले. मात्र युद्धामुळे माझी मुलगी तसेच इतर तरुण, तरुणी युक्रेन मध्ये अडकून पडले. यामुळे आम्हाला गेल्या चार दिवसांपासून चिंता लागून आहे. भारत सरकार त्या सर्वांना आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. शनिवारी रात्री युक्रेन येथून विमान भारतात येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे रविवारी माझी मुलगी भारतात येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
येळ्ळूर येथील जगन्नाथ पाटील यांनी ही माहिती ‘तरुण भारत’ला दिली. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमच्या मुलीची वाट पाहत आहे. ती सुखरुप परत यावी, हीच आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहे. माझी मुलगीच नाही तर भारतातील जेवढे विद्यार्थी आहेत, ते सर्वजण सुखरुप परत आले तर निश्चितच आम्ही सर्वांचे आभार मानू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ऐश्वर्या पाटील हिने येथील मराठी मॉडेल स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. बारावीपर्यंतचे शिक्षण रविंद्र टागोर महाविद्यालयात घेतले. त्यानंतर तिला युक्रेन येथील बुकोव्हिनीयन स्टेट मेडिकल विद्यापीठामध्ये एमबीएसाठी प्रवेश मिळाला. त्याठिकाणी ती डिसेंबर 2021 मध्ये शिक्षणासाठी गेली आहे. फर्स्ट सेमीस्टरची परीक्षादेखील तिने दिली असून दुसऱया सेमीस्टरच्या तयारीला ती लागली आहे. आता ऑनलाईनच्या माध्यमातूनच पुढील शिक्षण घेता येईल. त्यामुळे आम्ही आपली मुलगी प्रथम घरी यावी, हीच इच्छा व्यक्त करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या ही आमच्या संपर्कात आहे. ती आम्हाला फोनवर तेथील परिस्थिती सांगत आहे. मात्र आम्ही सारेच चिंतेत असल्याचे तिने सांगितले. आमची येथील विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी व्यवस्था केली आहे. असे असले तरी येणारा आवाज आणि भीती यामुळे रात्रीची झोपदेखील आम्हाला मिळत नाही. कधी काय होईल, याची शाश्वती नाही, असे ती सांगत होती. मात्र आम्ही तिला वेळोवेळी धीर दिला आहे. बऱयाचवेळा मोबाईलचा संपर्कदेखील होऊ शकत नाही. त्यामुळे आमचीदेखील चिंता वाढून आहे. आता तिने आम्ही निश्चितच भारतात येऊ, असे सांगितल्याने मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
आपला तसेच आपल्या सोबत असलेल्या विद्यार्थिनीचा फोटोही तिने आम्हाला पाठविला आहे. टी.व्ही.वरील युद्धाबाबतचे चित्रीकरण पाहून मनामध्ये आमच्या धडकी भरत आहे. आपली मुलगी काय करत असेल, कोणत्या संकटाला तोंड देत असेल, या विचारात आम्ही गेले चार-पाच दिवस कंठत आहे.
मुलगीने शिक्षण घ्यावे आणि वैद्यकीय सेवा बजावावी, अशी आमची इच्छा आहे. त्यानुसारच आतापर्यंत मुलीला मार्गदर्शन केले. मात्र आता या युद्धामुळे सर्व चित्रच पालटले आहे. पुढे काय होणार? याची काळजी आम्हा साऱयांनाच लागून आहे. कधी एकदा मुलगी घरी पोहोचेल याकडेच आमचे लक्ष लागून आहे. घरातील सर्वांनाच तिच्या येण्याची आतुरता लागून आहे.