दिवसभरात सर्वाधिक 129 रुग्ण : निपाणी तालुक्यात 12 जणांना बाधा
वार्ताहर/ निपाणी
महाराष्ट्र पाठोपाठ कर्नाटकातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना चिकोडी विभाग मात्र काहीसा सुरक्षित होता. असे असताना शनिवारी कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल प्रसिद्ध होताच चिकोडी विभागातून दिवसभरात 129 रुग्णांची भर पडली. यामध्ये निपाणी शहरातील 8 रुग्णांसह तालुक्यातील 12 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे कोरोना मीटर सुसाट वेगाने धावू लागल्याचे स्पष्ट झाले असून, लॉकडाऊन वाढविण्याचा विचार प्रशासनाकडून सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड, गोकाक, मुडलगी, रायबाग, हुक्केरी अशा चिकोडी विभागात कोरोना रुग्णसंख्या वाढीतून चिंता व्यक्त होत आहे. विभागातील सर्वच शहरांमध्ये लॉकडाऊनची कार्यवाही करुन खबरदारी घेण्यात आली आहे. असे असले तरी बेफीकीर असणारे नागरिक लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत गर्दी करत आहेत. ग्रामीण भागात लॉकडाऊन प्रभावीपणे पाळले जाताना दिसत नाही. काही ठिकाणी कारखाने सुरु ठेऊन लॉकडाऊनकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अशांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
शनिवारी उपलब्ध आलेल्या अहवालातून कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक चिकोडी विभागाने गाठला आहे. यामुळे खबरदारी घेताना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया स्थानिक प्रशासनाकडून सुरु झाली आहे. पण क्वारंटाईन प्रक्रिया देखील अडचणीत येताना संपर्कात आलेले पुढे येण्यास धजत नसल्याचे दिसत आहे. काही होमक्वारंटाईन तर बिनधास्त वावरताना दिसत असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
निपाणी शहरात 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यामध्ये आडके प्लॉट व प्रतिभानगरातील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. प्रतिभानगरातील 35 वर्षीय युवक, श्रीनगर येथील 30 वर्षीय महिला, नरसोबा गल्लीतील 24 वर्षीय महिला, प्रगती नगरातील 24 वर्षीय महिला, जत्राट वेशीतील 8 वर्षीय बालक यांचा समावेश आहे. निपाणीमध्ये समाविष्ठ करण्यात आलेल्या पण हमिदवाडा कारखाना परिसरात राहणाऱया एक वर्षीय बालकाची लिंगनूर (ता. कागल) प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील बुदिहाळ येथील 35 वर्षीय युवक निपाणीतील दवाखान्यात काम करत होता. त्या दवाखान्यात रुग्ण सापडताच त्याला होमक्वारंटाईन करण्यात आले होते. बुदलमुख येथील कोरोनाबाधित असलेली 22 वर्षीय महिला बाळंतीण आहे. निपाणीतील रुग्णालयात प्रसुती 8 दिवसापूर्वी झाली आहे. भोज येथील 54 वर्षीय इसम असून तो हुपरी येथील साखर कारखान्यात काम करत होता. बारवाड येथील 51 वर्षीय इसमालाही कोरोनाची बाधा झाली आहे.