भु गटाराच्या गैरव्यवस्थेमुळे ग्रामस्थांना गावाच्या पर्यावरणाची चिंता
प्रतिनिधी /वास्को
चिखली पंचायत क्षेत्रातील काही भागात भू गटार व्यवस्था व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्यांची योग्य सुविधा नसल्याने मोठय़ा निवासी प्रकल्पांना पंचायतीने परवानी देऊ नये अशी मागणी रविवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली. मोठमोठय़ा प्रकल्पांसाठी सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी योग्य सुविधा नसल्याने चिखली गावातील पर्यावरणावर त्याचा परीणाम होत असल्याचे ग्रामस्थानी म्हटले आहे.
जवळपास दोन वर्षांच्या खंडानंतर काल रविवारी चिखली पंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामस्थांचा या सभेला चांगला प्रतिसाद लाभला.कचरा, विल्हेवाटीचा प्रश्न, भू गटार, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जॉगर्स पार्कच्या देखभालीचा प्रश्न, वाढते निवासी प्रकल्प अशा विविध प्रश्नावर या सभेत चर्चा झाली. काही प्रश्नांवर या सभेत वातावरण तापले. आल्त दाबोळी भागात मोठमोठे निवासी प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अजूनही काही प्रकल्प उभे राहात आहेत. मात्र, या भागात या प्रकल्पांसाठी भू गटार वाहिनी नाही. त्यांच्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाहीत. या साधनसुविधांच्या कमतरतांमुळे चिखली गावातील पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थ करीत असतात. याच मुद्दय़ांवरून चिखलीच्या ग्रामसभेत वातावरण तापले. स्थानिकांनी या समस्येबाबत गंभीर चिंता व्यक्त करून दाबोळीतील निवासी प्रकल्पांची सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था कशी आहे याविषयीचे सर्वेक्षण करावे अशी मागणी केली.त्या प्रकल्पांना नसलेल्या सुविधा उपलब्ध कराव्यात व एखादा प्रकल्प व सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करताना स्थानिक ग्रामस्थांनाही विश्वास घेण्यात यावे अशी सुचना ग्रास्थांनी ग्रामसभेत केली. मोठमोठय़ा निवासी प्रकल्पांसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसताना चिखली पंचायतीकडून अशा प्रकल्पांसाठी परवाने देण्याची कृती गैर असून असे परवाने देणे बंद करण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी या सभेत केली.
कोविड संसर्गामुळे बंद राहिलेला चिखलीतील जॉगर्स पार्क नुकताच खुला करण्यात आलेला असून या पार्कमध्ये सकाळ संध्याकाळ नागरिकांची गर्दी पडू लागलेली आहे. परंतु या पार्कच्या देखभालीची तातडीची गरज निर्माण झालेली आहे. पार्कच्या देखभालीचा प्रश्न ग्रामस्थांनी सरपंचांच्या नजरेस आणून दिला असता पंचायतीकडे निधीची कमरता असल्याचे म्हणणे सरपंचांनी मांडले. त्यामुळे ग्रामस्थांनी सरपंचांकडे नाराजी व्यक्त केली. मात्र, सरपंच सॅबी परेरा यांनी पार्कमधील शौचालय, वीज व्यवस्थेचा प्रश्न व अन्य काही कामे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. जॉगर्स पार्कच्या देखभालीची जबाबदारी जीएसआयडीसीकडे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
या ग्रामसभेत सिरील फर्नांडिस, विरीयेतो फर्नाडिस, ऍडवीन म्हास्कारेन्हास, प्रताप म्हार्दोळकर, सौ. अलका दामले या समाजसेवकांसह अन्य ग्रामस्थांनीही प्रश्न मांडले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सरपंच सॅबी परेरा यांनी या ग्रामसभेत विविध प्रश्नावर चर्चा झाली व ग्रामस्थांनी योग्य सहकार्य केल्याचे सांगितले. वाढते निवासी प्रकल्प व त्यांच्या सुविधांचा प्रश्न असला तरी स्थानिक पंचायत पंचायतीला असलेल्या अधिकारांअंतर्गंतच निर्णय घेऊ शकते. पंचायत बांधकामे रोखू शकत नसल्याचे सरपंच म्हणाले. कचऱयाच्या समस्येविषयी बोलताना येत्या काही दिवसांत कचरा विल्हेवाटीसाठी एमआरएफ सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. चिखली कोमुनिदादने या सुविधेसाठी 450 चौ. मि. जमीन उपलब्ध केल्याचे सांगून त्यांनी कोमुनिदादचे आभार मानले.पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांचेही विविध कामात सहकार्य मिळत असल्याचे ते म्हणाले.