प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीला लवकरच कचऱयापासून गॅस निर्मिती करणारा बायो मेथानेशन प्रकल्प उपलब्ध होणार आहे. चिखली पंचायतीने या प्रकल्पासाठी आवश्यक अशी सज्जताही ठेवलेली आहे. अशा प्रकारचा प्रकल्प उभारणारी चिखली पंचायत गोव्यातील पहिली पंचायत ठरणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी या प्रकल्पासाठी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी पायाभरणी केली. तसेच पंचायतीसाठी उभारलेल्या एमआरएफ प्रकल्पाचे उद्घाटनही पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. चिखली पंचायतीला सरकारकडून कचरा विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत 2 कोटी 8 लाखांचे साहित्य उपलब्ध करण्यात आलेले असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
चिखली पंचायत क्षेत्रात चिखली औद्योगिक वसाहतीजवळच कचऱयावर प्रक्रिया करणारी एमआरएफ ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या ठिकाणीच कचऱयापासून बायोगॅसची निर्मिती करणारा बायोमेथानेशन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पंचायतीने त्यासाठी पूर्वतयारीही केलेली आहे. चिखली कोमुनिदादने या प्रकल्पासाठी 4500 चौ. मि. जमीन उपलब्ध केलेली आहे. येत्या सहा महिन्यात हा प्रकल्प तयार होणार असल्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले. या ठिकाणी पंचायतीला दर दिवसा पाच टन ओला कचरा हाताळणे शक्य होणार आहे. या ठिकाणी येणारा सुका कचरा गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गंत सरकारने गोव्यातील ग्रामीण भागांच्या स्वच्छतेसाठी 120 कोटींचा निधी उपलब्ध केलेला असून ‘स्वच्छता की ओर’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नारा घेऊन राज्य सरकार सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे. चिखली पंचायतीला कचरा व स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 2 कोटी 80 लाखांचे साहित्य उपलब्ध केलेले आहे. अशी मदत प्राप्त केलेली चिखली ही गोव्यातील पहिली पंचायत असून या पंचायतीसाठी लवकरच बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प लाभणार आहे. हा प्रकल्प मिळवणारीही चिखली पंचायत गोव्यातील पहिली पंचायत ठरणार असल्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
गोव्यातील सर्वच पंचायतीनी कचरा व स्वच्छतेचा प्रश्न स्वातंत्र्यरीत्या हाताळावा यासाठी सरकार सर्व पंचायतींना सुविधा उपलब्ध करणार आहे. बायोगॅस प्रकल्प देणार आहे.. स्वच्छतेचे हे कार्य अखिल गोवा पातळीवरून होत आहे. लवकरच शेजारच्या चिकोळणा बोगमाळो पंचायत क्षेत्रातही एमआरएफ सुविधा उपलब्ध होईल असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले. चिखली पंचायतीला पाच कचरावाहू रिक्षा व दोन कचरावाहू ट्रक प्रदान करण्यात आले आहेत. या प्रसंगी चिखलीचे सरपंच सॅबी परेरा, उपसरपंच कमलाप्रसाद यादव, मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, उपनगराध्यक्ष श्रध्दा महाले, नगरसेवक सुदेश भोसले, विनोद किनळेकर तसेच चिखली व बोगमाळो पंचायतीचे पंच सदस्य व मान्यवर उपस्थित होते.