सरसंघचालक भागवत 7 दिवसांच्या दौऱयावर
वृत्तसंस्था/ चित्रकूट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 7 दिवसीय दौऱयानिमित्त मध्यप्रदेशात पोहोचले आहेत. 8 जुलैपासून धर्मनगरी चित्रकूट येथे होणाऱया संघाच्या 5 दिवसीय चिंतन शिबिरात भागवत सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी दोन दिवस ते अन्य भेटीगाठी करण्यास कार्यक्रमांमध्ये सामील होणार आहेत.
चित्रकूटमधील पंडित दीनदयाळ संशोधन संस्था आरोग्यधाम येथे होणाऱया संघाच्या चिंतन शिबिरात ते सामील होणार आहेत. यादरम्यान राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारच्या कामकाजाच्या आकलनासह आगामी विधानसभा निवडणुकीवरूनही मंथन होणार आहे.
पुढील वर्षी होणाऱया उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱया संघाच्या या बैठकीला महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या बैठकीत क्षेत्र प्रचारकांसह अखिल भारतीय कार्यकारिणीचे पदाधिकारीही भाग घेणार आहेत. कोरोना संकटामुळे अन्य स्वयंसेवक डिजिटल माध्यमातून सामील होतील.
या बैठकीत संघ पुढील वर्षाच्या कार्यांची रुपरेषा आखणार आहे. संघाची ही बैठक दरवर्षी होते. पण उत्तरप्रदेशात पुढील वर्षी निवडणूक होणार असल्याने संघाच्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून राहणार आहेत. भागवत चित्रकूट येथे पोहोचण्यापूर्वीच मध्यप्रदेशातील अनेक मंत्र्यांनी तेथे तळ ठोकला आहे.
8 जुलै रोजी संघाची क्षेत्रीय प्रचारक चित्रकूट येथे पोहोचतील तर 9 आणि 10 जुलै रोजी क्षेत्रीय प्रचारकांच्या बैठकीत भागवत सामील होणार आहेत. त्यानंतर 10-11 जुलै रोजी प्रांतीय प्रचारकांसोबत भागवत व्हर्च्युअली बैठक घेणार आहेत. कोरोना संकट पाहता 300 प्रचारक ऑनलाइन स्वरुपात बैठकीशी जोडले जातील. संघाच्या या बैठकीत उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील सरकारांची कार्यशैली तसेच जनतेमधील मत याविषयी मंथन होणार असल्याचे समजते. उत्तरप्रदेश निवडणुकीच्या दृष्टीकोनातून संघाकडून दिशानिर्देशही निश्चित होऊ शकतात.