‘बॉम्बे फ्लाईंग’मधून यावर्षी बाहेर पडलेली कोकणातील एकमेव महिला वैमानिक, लहानपणापासून बाळगलेले स्वप्न विसाव्या वर्षीच साकार
प्रतिनिधी चिपळूण
वैमानिक तयार करणाऱया बॉम्बे फ्लाईंग क्लबमध्ये सहा सहा वर्षे प्रशिक्षण घेऊनही अनेकांना वैमानिक बनने साध्य होत नाही. मात्र ते चिपळूणची सुकन्या निधी भोसले हिने अवघ्या दीड वर्षात सिध्द करून दाखवले आहे. लहानपणापासून बाळगलेले स्वप्न साकार करण्याच्यादृष्टीने प्रचंड जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाच्या जोरावर यश मिळवत विसाव्या वर्षीच ती वैमानिक झाली आहे. विशेष म्हणजे बॉम्बे फ्लाईंग क्लबमधून निवड झालेल्या यावर्षीच्या तुकडीतील कोकणातील एकमेव महिला वैमानिक असल्याने कोकणच्या शिरपेचात निधीने मानाचा तुरा रोवला आहे.
निधी ही माजी नगराध्यक्ष स्व. सदाशिव भोसले यांची नात, तर विद्यमान नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांची भाची आहे. चिपळूण बाजारपेठेतील यशस्वी व्यावसायिक मंगेश भोसले यांची ती कन्या आहे. निधीचे प्राथमिक शिक्षण हे ख्रिस्तज्योती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, तर बारावीपर्यतचे शिक्षण शहरातील डीबीजे महाविद्यालयात झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी 2018 मध्ये तिने बाम्बे फ्लाईंग क्लबमध्ये बीएस्सी आणि कमर्शियल पायलट ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतला. कमर्शियल पायलटचे लायसन्स मिळवण्यासाठी 200 तास विमान चालवावे लागे. त्याचबरोबर सहा पेपरही सोडवावे लागतात. बॉम्बे फ्लाईंगमध्ये देशभरातील हजारो तरूण वैमानिक बनण्याची स्वप्ने घेऊन येतात. कोणी अभियांत्रिकीची पदवी घेऊन, तर कोणी वेगवेगळ्या शाखेच्या पदव्या घेऊन येतात. पाच ते सहा वर्षे प्रशिक्षण घेऊनसुध्दा अनेकांना वैमानिक होता येत नाही. मात्र निधीने पहिल्या दीड वर्षातच आपले कर्तृत्व सिध्द करून दाखवले. वयाच्या विसाव्या वर्षीच 200 तास विमान चालवत आणि आवश्यक सहाही पेपर पहिल्या फेरीत सोडवणारी निधी ही पहिलीच विद्यार्थिनी आहे.
निधीने पहिले एक वर्ष 2 महिने धुळे येथे सिंगल इंजिन विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. मात्र पुढे मल्टी इंजिन चालण्याचे प्रशिक्षण महाराष्ट्रात नसल्याने तिने ते हैद्राबाद येथे 22 दिवसांत पूर्ण केले. निधीची गुणवत्ता पाहून तिला दोन कंपन्यांकडून नोकरीची आŸफर आली आहे. मात्र तिला एअर लायसन्समध्येच करिअर करायचे असल्याचे तिने सांगितले. पायलट बनण्यासाठी साधारण तीस लाखाचा खर्च येतो. निधीने बाŸम्बे फ्लाईंग क्लबमधील गुणवत्ता आणि पायलट होण्यासाठीचे पेपर पहिल्या फेरीतच चांगल्या गुणानी सोडवल्याने टाटा ट्रस्टने तिला दहा लाखाची शिष्यवृत्तीही दिली आहे.
लहानपणापासून बाळगलेले स्वप्न साकार
वैमानिक बनण्याचे स्वप्न आपण लहानपणापासूनच बाळगले होते. आजोबांकडून मला प्रेरणा मिळाली होती. आई-बाबांनी पाठिंबा दिला. दोनशे तास विमान चालवणे आणि सहा अवघड पेपर सोडवणे हे बाŸम्बे फ्लाईंग क्लबमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वानाच सहा-सहा वर्षे काढूनही ते शक्य होत नाही. मात्र आपण पहिल्या दीड वर्षातच ते सिध्द करून दाखवले. यासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असावे लागते. लहानपणापासून बाळगलेले स्वप्न आज साकार झाले याचा मनस्वी आनंद होत आहे. माझ्या या यशात आई-बाबांचा मोठा वाटा असल्याचे निधीने सांगितले.
निधीचा सार्थ अभिमान
एक स्त्री असूनही निधी वैमानिक झाली याचा नक्कीच अभिमान आहे. माझी ती भाची असून आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता याच्या जोरावरच आज ती वैमानिक झाली. प्रत्येक स्त्रीने असाच स्वत:वरचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता कायम ठेवली तर त्या जगाच्या टोकापर्यंत जाऊ शकतात. सुरेखा खेराडे-नगराध्यक्षा, चिपळूण