मुख्य वितरकाला बांदा येथून पोलिसांनी केली अटक
चिपळूण
शहरातील रंगोबा साबळे परिसरात 26 लाख रूपये किंमतीचा गुटखा चिपळूण पोलिसांनी पकडल्यानंतर याचे थेट कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सावंतवाडीपर्यंत पोहचले आहे. याप्रकरणी मुख्य वितरकाला चिपळूण पोलिसांनी बांदा येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याने हा गुटखा कोणाकडून आणला, त्याचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, गुटखा प्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
भूषण श्रीकृष्ण शिरसाट (53, बांदा-सावंतवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे, तर यापूर्वी या गुटखा प्रकरणी मुश्ताक जिकर कच्छी, अंकुश सुनील केसरकर, संदीप भैरु पाटील या तिघांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील रंगोबा साबळे मार्गालगतच्या नजराना अपार्टमेंट परिसरात आयशर टेम्पो व मारुती इको या दोन वाहनांमध्ये गुटखा भरुन तो विक्रीच्या उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांनी धाड टाकून वाहनासह 26 लाख 9 हजार 150 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी गुटखा प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याच्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्यांच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यासाठी मुश्ताक कच्छी याची चौकशी केल्यानंतर त्याने हा गुटखा सावंतवाडी येथून आणल्याची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरु करत चिपळूण पोलिसांचे एक पथक सोमवारी सावंतवाडीला रवाणा झाले होते. त्याठिकाणाहून मुख्य वितरक असलेल्या शिरसाट याला ताब्यात घेत अटक केली. गुटखा प्रकरणाचा मुख्य वितरक हा शिरसाट असून त्याने एवढय़ा किंमतीचा गुटखा हा कच्छी याला दिला होता. कच्छी त्याचे पुढे वितरण करणार होता. असे असतानाच पोलिसांनी धाड टाकताच तो यात सापडला.
शिरसाट यास मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच मुश्ताक कच्छी, अंकुश केसरकर, संदीप पाटील यांची मंगळवारी पोलीस कोठडी संपताच त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, शिरसाट याच्या पोलीस चौकशीतून त्याने इतक्या मोठय़ा किंमतीचा गुटखा कोठून आणला, तो कोठे तयार केला जात होता, या साखळीत आणखी कितीजण सहभागी आहेत ही माहिती पुढे येणार आहे.