प्रतिनिधी/ चिपळूण
तब्बल 120 वर्षे पार केलेल्या चिपळूण तहसील कार्यालयाचे छत आता अखेरची घटका मोजत आहे. त्याचा काही भाग केव्हाही कोसळण्याची भीती निर्माण झाली असतानाच सार्वजनिक बांधकाम विभाग या महत्वाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करून नको त्या भागात लाखो रूपयांची उधळण करीत आहे. कार्यालयातील वायरींग लेंबकळत असून शौचालयाची अवस्थाही बिकट झाली आहे. त्यामुळे याबाबत कार्यालयाकडून होणाऱया पत्रव्यवहारालाही केराची टोपली दाखवली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटीशकालीन आहे. 1900साली ती साकारण्यात आली असून तिचे बांधकाम चुना, वाळू व तोडीचे असल्याने ते मजबूत आहे. त्यामुळे त्यात साधा खिळा मारणेही शक्य होत नाही. मात्र छत लाकडी असल्याने ते गेल्या अनेक वर्षापासून नादुरूस्त झाले आहे. त्यामुळे त्याची कौले अनेकदा डोक्यात पडून कामासाठी येणाऱया नागरिकांसह कर्मचाऱयांच्या डोक्यात, अंगावर पडून त्यांना जखमी व्हावे लागले आहे. तरीही येथे नवीन इमारत होणार आहे असे कारण देत छताच्या कायमस्वरूपी दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता हे छत अखेरची घटका मोजताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी ते कोसळून कोण जखमी होणार, अशी भीती सर्वांना वाटत आहे.
मुळातच या छताची दुरूस्ती होणे गरजेचे असताना बांधकाम विभाग दरवर्षी पावसाळय़ात यावर प्लास्टीक कापडाचा मुलामा देत वेळ मारून नेत आहे. यावर्षी तर काही मोजक्याच कापडांसाठी चक्क 50 हजार रूपये खर्च केला गेला आहे. गेल्या दहा वर्षात या इमारतीच्या दुरूस्तीसाठी लाखो रूपयांची उधळण झाली आहे. सध्या छतावर जुने व नवे कापड टाकण्यात आले असले तरी गळती मात्र कायम आहे. तसेच कार्यालयातील वायरींग लोंबकळत असून ते अंगावर पडते की काय, अशी भीती कर्मचाऱयांना वाटत आहे. तहसील कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱयांसह कर्मचाऱयांसाठी येथे एकमेव शौचालय आहे. मात्र तेही नादुरूस्त असून त्याला अस्वच्छतेचा विळखा दिसून येत आहे.
तहसील कार्यालयाची ही अवस्था तर…
तालुक्याच्या दृष्टीने तहसील कार्यालय महत्वाचे मानले जाते. तहसीलदारांना तर अनेक अधिकार आहेत. असे असताना या कार्यालयातील गैरसोयींबाबत बांधकाम विभागाकडे केल्या जाणाऱया पत्रव्यवहारला चक्क केराची टोपली दाखवली जात असल्याने बांधकाम विभाग इतर कार्यालये व सर्वसामान्यांच्या पत्रव्यवहारांची किती दखल घेत असेल हे यावरून स्पष्ट होत आहे.