भोला शंकर चित्रपटात दिसणार अभिनेत्री
दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी हे आगामी चित्रपट ‘भोला शंकर’वरून सध्या चर्चेत आहेत. हा एक ऍक्शन एंटरटेनर चित्रपट आहे. मेहर रमेश यांच्याकडून याचे दिग्दर्शन केले जात असून रामब्रह्मम सुकर्ण यांच्याकडून याची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपटाचे चित्रिकरण 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत चित्रपटाच्या कलाकारांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. अभिनेत्री तमन्ना भाटिया या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.
तमन्नाला चित्रपटात चिरंजीवी यांची नायिका म्हणून निवडण्यात आले आहे. हा तमन्ना आणि चिरंजीवी या जोडीचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी ‘से रा नरसिंह रेड्डी’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले होते. तमन्ना अभिनेत्री असण्यासह एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. या चित्रपटात कीर्ति सुरेश देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. यात ती चिरंजीवी यांच्या बहिणीची भूमिका साकारत आहे.
यंग सेंसेशन महाती स्वरा सागर या चित्रपटाच्या गाण्यांना संगीतबद्ध करत आहे. निर्माते लवकरच या चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे जाहीर करणार आहेत. ‘भोला शंकर’ हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.