दौऱयात एकूण सहा सामने खेळणार, सुमन देवी कर्णधारपदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाला कोरोना महामारीच्या मोठय़ा ब्रेकनंतर स्पर्धात्मक खेळ पुन्हा सुरू करण्याची संधी मिळणार असून या महिन्यात हा संघ सहा सामन्यांसाठी चिलीच्या दौऱयावर जाणार आहे.
डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्ध शेवटचे सामने खेळले होते.ाdन चिली दौऱयात या संघाचे चिलीच्या कनिष्ठ संघाविरुद्ध 17 व 18 जानेवारी रोजी सामने होणार आहेत. त्यानंतर त्यांचे चिलीच्या वरिष्ठ महिला संघाविरुद्ध 20, 21, 23, 24 जानेवारी रोजी उर्वरित सामने खेळविले जाणार आहेत. ‘गेल्या ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात दाखल झाल्यापासून कनिष्ठ महिला संघाने भरपूर मेहनत घेतली आहे. आता चिलीमध्ये होणाऱया सामन्यात त्यांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे,’ असे कनिष्ठ महिला संघाचे प्रशिक्षक एरिक वॉनिक म्हणाले.
शुक्रवारी हॉकी इंडियाने या दौऱयासाठी 24 सदस्यीय कनिष्ठ महिला संघाची घोषणा केली असून बचावपटू सुमन देवी थौडमकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे तर इशिका चौधरीवर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या वर्षी कनिष्ठांची विश्वचषक स्पर्धा होणार असून त्याच्या तयारीसाठी हा दौरा उपयुक्त ठरणार आहे. ‘कोरोना महामारीमुळे खेळाडूंना मॅचप्रक्टिस मिळालेली नाही. चिली दौऱयामध्ये त्यांन ही उत्तम संधी मिळाली असल्याने आपला संघ तेथे खेळण्यास उत्सुक झाला आहे. अगदी योग्यवेळी या दौऱयाचे आयोजन होत असल्याने तेथील अनुभव संघासाठी मोलाचा ठरणार आहे,’ असे कर्णधार सुमन देवी म्हणाली. स्पर्धेपासून दूर राहणे खूप कठीण गेले. त्यामुळे चिलीचा दौरा अगदी योग्य वेळी होत आहे, असे आम्हाला वाटते. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही कसून सराव केला असून हा दौरा आम्हाला कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणार आहे. ही स्पर्धा एप्रिल 2021 मध्ये होणार आहे, असेही ती म्हणाली. महिला कनिष्ठ संघाने ऑस्ट्रेलियामध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय दौरा केला होता आणि त्यात समाधानकारक प्रदर्शन केले होते. भारताने त्यात दोन सामने जिंकले, एक अनिर्णीत राखला आणि एका सामन्यात ते पराभूत झाले होते.
हॉकी इंडिया व चिली फील्ड हॉकी फेडरेशन, या दौऱयात गुंतलेल्या सर्वांसाठी जैव सुरक्षित कवच तयार केले जाणार आहे. ‘संपूर्ण भारतीय संघाची (खेळाडू व स्टाफ) दोनदा चाचणी केली जाणार आहे. भारतातून प्रयाण करण्याच्या 72 तास आधी आणि नंतर चिलीत आगमन झाल्यावर दुसऱयांदा ही कोरोना चाचणी होणार आहे. या चाचणीनंतर चिलीमध्ये भारतीय संघाचा सराव सुरू होणार आहे,’ असे हॉकी इंडियाने सांगितले. ‘चिलीत दाखल झाल्यावर प्रत्येक सदस्याला निगेटिव्ह अहवालाचा दाखला प्रतिज्ञापत्रासह सादर करावा लागणार आहे. चिलीमध्ये असताना संघातील प्रत्येक सदस्याला बायो-बबलचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागणार असून हॉटेल ते मैदान व पुन्हा परत हॉटेल, एवढाच त्यांना प्रवास करावा लागणार आहे. फक्त सामन्यादिवशी आणि सरावावेळी त्यांना हॉटेलमधून बाहेर जाण्याची परवानगी असेल. अन्य दिवशी त्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई असेल,’ असेही हॉकी इंडियाने स्पष्ट केले.
चिली दौऱयासाठी जाहीर करण्यात आलेली खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे : सुमन देवी थौडम (कर्णधार), इशिका चौधरी (उपकर्णधार), खुशबू, रशनप्रीत कौर, महिमा चौधरी, प्रियांका, गगनदीप कौर, सुषमा कुमारी, अक्षता ढेकळे, बलजीत कौर, चेतना, मारियाना कुजुर, अजमिना कुजुर, रीत, प्रभलीन कौर, वैष्णवी फाळके, प्रीती, जीवन किशोरी टोपो, मुमताज खान, रुतुजा पिसाळ, संगीता कुमारी, ब्युटी डुंगडुंग, लालरिन्डिकी, दीपिका.