न्यूयॉर्क
जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) यांच्या एका टीमने शुक्रवारी वुहानमधील एका रुग्णालयाची तपासणी केली. देशामध्ये कोविड19मुळे बाधित झालेल्या पहिल्या रुग्णावर योग्य उपचार होऊन तो रुग्ण बरा झाल्याचा तपशील यावेळी चीनकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. डब्लूएचओची टीम चीनमधील वुहान शहरात कोरोना विषाणूची उत्पत्ती आणि त्याचा प्रवास याबाबत चौकशी करण्यासाठी चीन दौऱयावर आल्याची माहिती आहे. चीनच्या वुहान शहरामध्ये डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाचे पहिले प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर हा विषाणू संपूर्ण जगभरात पसरल्याने मोठय़ा प्रमाणात त्याने थैमान घालून जगाला वेठिस धरल्याचे दिसून आले आहे. चीनमध्ये 14 सदस्यांची टीम 14 जानेवारी रोजी वुहानमध्ये पोहोचली आहे. 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर पुन्हा आपल्या शोध कार्यास त्यांनी प्रारंभ केल्याची माहिती आहे.