ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमध्ये बनावट कोरोना लसीचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी 80 हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून, या टोळीकडून 3 हजार लसीचे डोस जप्त करण्यात आले आहेत. चिनी वृत्तसंस्था शिन्हुआने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
जगभरातील अनेक देश कोरोनावरील लस विकसित करण्यात गुंतले असताना अशा प्रकारे बनावट लसी बाजारात आल्याने चिंता वाढली आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून सप्टेंबर महिन्यांपासून बनावट लसींचा पुरवठा सुरू होता. बनावट लसी परदेशात पोहोचविण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी बीजिंग, शांघाई, पूर्व प्रांतातील शानदोंगसह अनेक ठिकाणी छापेमारी करत हा प्रयत्न उधळून लावला.