ऑनलाईन टीम / बीजिंग :
मागील वर्षी चीनचा लोकसंख्या वाढीचा दर 1960 च्या दशकानंतर सर्वात कमी आहे. ही बाब लक्षात घेता चीनने कुटुंब नियोजन धोरण शिथिल केले आहे. चिनी जोडप्याला आता दोन ऐवजी तीन मुले जन्माला घालता येतील. चीनने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.
चीनच्या नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार चीनच्या लोकसंख्येचा मोठा भाग वयस्कर होताना दिसत आहे. तर लोकसंख्या वाढीची गतीही काहीशी मंदावली आहे. त्यामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांना अडथळा येत आहे, याची चीनला चिंता आहे. त्यामुळे चीन सरकारने दाम्पत्याला 2 ऐवजी 3 अपत्य जन्माला घालण्याची परवानगी दिली आहे. नव्या धोरणाला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची मंजूरी मिळाली आहे.
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनची लोकसंख्या सध्या 1.41 अब्ज एवढी आहे.