दोघांना लागण : उंदरांपासून संसर्ग होत असल्याचे स्पष्ट
बीजिंग / वृत्तसंस्था
कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमध्ये ब्यूबॉनिक प्लेग हा नवा रोग आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. उत्तर चीनमधील एका शहरामध्ये नुकतीच ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संशयित रुग्ण सापडले. या रोगाची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे. या आजाराचा प्राण्यांमधून मानवामध्ये सहज संसर्ग होत असल्यामुळे आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ब्यूबॉनिक प्लेगला ‘ग्लिटीवाला प्लेग’ असेही संबोधले जाते. या आजाराने पीडित व्यक्तीला असहय़ वेदना होतात. तसेच ताप, त्वचेची जळजळ, शरीरावर फोड येणे अशी लक्षणे दिसून येतात. हा रोग उंदरांमार्फत पसरत असून प्लेगच्या विषाणूंचा संसर्ग असलेला उंदीर मृत झाल्यानंतर त्याच्या शरीरावरील पिसवांच्या माध्यमातून तो मानवापर्यंत पोहोचतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) मते ब्यूबॉनिक प्लेगसंबंधीची माहिती जारी केली आहे. या आजारात त्वचेवर येणाऱया फोडांमुळे त्याला ब्यूबॉनिक असे नाव पडल्याचे सांगण्यात आले.
ब्यूबॉनिक प्लेग हा एक दुर्मिळ आजार असून 2010 ते 2015 दरम्यान काँगो, मादागास्कर आणि पेरू या देशांमध्ये 3,248 प्रकरणे समोर आली होती. या रुग्णांपैकी 558 जणांचा मृत्यू झाला होता. आता या रोगाचा प्रसार चीनमध्ये सुरू असल्याने तेथे अलर्ट जारी केला आहे. कोरोनाच्या संसर्गातच या रोगाचे रुग्ण सापडल्याने भीती वाढली आहे.