वृत्तसंस्था /शांघाय :
चायनीज चॅम्पियन गुआंगझू एव्हरगँडने गुरुवारी नव्या स्टेडियमच्या बांधणीला सुरुवात केली असून एक लाख प्रेक्षकक्षमता असलेल्या या स्टेडियमसाठी 12 अब्ज युआन (1.7 अब्ज डॉलर्स) खर्च अपेक्षित आहे. जगातील सर्वात मोठय़ा स्टेडियमपैकी एक अशी त्याची गणना होणार आहे.
बार्सिलोनातील सुप्रसिद्ध कॅम्प नोवू स्टेडियमपेक्षा हे नवे स्टेडियम मोठे असणार आहे. 2022 अखेरपर्यंत ते बांधून पूर्ण होणार असल्याचे वृत्त झिन्हुआ न्यूज एजन्सीने दिले आहे. गुआंगझू एव्हरग्रँड फुटबॉल स्टेडियमचा बाहय़ आकार कमल फुलासारखा असून चीनच्या या दक्षिणेकडील शहराला ‘फ्लॉवर सिटी’ म्हणून ओळखले जात असल्याने स्टेडियमच्या या डिझाईनला मान्यता मिळाली आहे. बार्सिलोनातील कॅम्प नोवू स्टेडियमचाही पुनर्विकास होत असून त्याची क्षमता 105,000 करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या तरी लोटस स्टेडियम जगातील सर्वाधिक क्षमतेचे फुटबॉल स्टेडियम म्हणून ओळखले जाणार आहे.
आठवेळचे चायनीज चॅम्पियन असलेल्या गुआंगझूचा घरच्या मैदानावर सामना असल्यास सरासरी 50,000 प्रेक्षक उपस्थित राहतात. या संघाने दोनदा एएफसी चॅम्पियन्स लीग जिंकली असून इटलीच्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य फॅबिओ कॅनाव्हारो हे या संघाचे प्रशिक्षक आहेत. चीन सरकार देशात फुटबॉलचा प्रसार होण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असून त्यानुसार देशभरात अनेक प्रमुख ठिकाणी नवे स्टेडियम्स बांधण्यात येत आहेत. एव्हरग्रँडचे चायनीज सुपर लीगमधील प्रतिस्पर्धी शांघाय एसआयपीजी हे देखील नवे स्टेडियम बांधत असून त्याची क्षमता 33000 प्रेक्षकांची आहे. 2021 मध्ये ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
नव्याने विस्तारित केलेल्या 2021 फिफा क्लब वर्ल्ड कपचे आणि 2023 मधील एएफसी आशियाई चषक स्पर्धेचे आयोजन चीन करणार असून शांघायने ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्यात रस दाखविला आहे.