नव्या वायुदलप्रमुखांचे प्रतिपादन – स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणेकरता प्रयत्न
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राफेल, अपाचेचा वायुदलाच्या ताफ्यात समावेश झाल्याने आमच्या सामर्थ्यात मोठी भर पडली आहे. आमच्या ताफ्यात नव्या शस्त्रास्त्रांच्या एकीकरणासोबत आमची आक्रमक स्ट्राइक क्षमता आणखीनच शक्तिशाली झाली आहे. चीन आणि पाकिस्तानची भागीदारी निर्माण झाली असली तरीही भारत या आव्हानाचा यशस्वीपणे मुकाबला करण्यास सक्षम असल्याचे उद्गार वायुदलाचे नवे प्रमुख व्ही.आर. चौधरी यांनी मंगळवारी काढले आहेत.
चीन-पाकिस्तान भागीदारीबद्दल घाबरण्याची भारताला गरज नाही. पण पाश्चिमात्य तंत्रज्ञान पाकिस्तानकडून चीनकडे जात असल्याने चिंतेची बाब आहे. सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी आम्ही आमचे नेटवर्क अधिक बळकट केले आहे. आमच्या महत्त्वपूर्ण मूलभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात उपाययोजना केल्या जात असल्याचे विधान चौधरी यांनी केले आहे.
सशस्त्र दलांदरम्यान एकीकरणाबद्दल भारतीय वायुदल उत्सुक आहे. तिन्ही संरक्षण दलांकडून संयुक्त योजना आणि संचालनामुळे आमच्या युद्धक्षमतेत मोठय़ा प्रमाणात वृद्धी होणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी वायुदल अद्याप तीन वायुतळांवर ठाण मांडून आहे. आम्ही आमच्या बाजूने पूर्णपणे तैनात आणि तयार आहोत असे वायुदलप्रमुखांनी म्हटले आहे.
चीनची क्षमता?
चौधरी यांना लडाखनजीक चिनी वायुदलाच्या क्षमतेबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी अनेक उंचीयुक्त ठिकाणी मोहीम राबविण्याची चीनची क्षमता कमजोर राहणार असल्याचे सांगितले आहे. मिग-21 दुर्घटनांना नाकारले जाऊ शकत नाही. पण आकडेवारी पाहिल्यास दुर्घटनांच्या संख्येत घट झाल्याचे समजते. उड्डाण करणारे प्रत्येक विमान सर्वप्रकारच्या चाचण्यांना सामोरे जात असते. आमच्याकडे मिग-21 च्या 4 स्क्वाड्रन्स असून पुढील तीन-चार वर्षांमध्ये त्यांची सेवा टप्प्याटप्प्याने समाप्त केली जाऊ शकते असे ते म्हणाले.
ड्रोन हल्ले रोखणार
स्वदेशी ड्रोनविरोधी क्षमतेवर काम करण्याचा आम्ही दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहोत. आम्ही वायुदलासाठी काउंटर युएएस प्रणालीला डिझाइन आणि विकसित करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. 5 व्या पिढीच्या लढाऊ विमानाची गरज डीआरडीओकडून विकसित करण्यात येणाऱया एएमसीए (स्वदेशी पाचव्या पिढीचे विमान)द्वारे पूर्ण होईल आणि सीमापार देशाच्या क्षमतेच्या तोडीस तोड असेल. जुन्या विमानांना कालबद्ध पद्धतीने सेवेतून दूर करणे आणि नव्या विमानांना सामील करण्यासाठी आमच्याकडे पुढील दशकापर्यंत सुमारे 35 लढाऊ स्क्वाड्रन्स असतील असे वायुदलप्रमुखांनी सांगितले आहे.
कोईम्बतूर प्रकरण
लैंगिक शोषणाच्या कुठल्याही घटनेवर भारतीय वायुदलाचा कायदा अत्यंत कठोर आहे. महिला अधिकाऱयाने टू-फिंगर टेस्ट करण्यात आल्याचा केलेला आरोप चुकीच असल्याचे सांगण्यात आले आहे. आम्ही नियमांबद्दल जाणून असून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.