मुंबई / वृत्तसंस्था
गुणतालिकेत तळाच्या लाईनअपमध्ये फेकल्या गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्सचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली दुखापतीमुळे पुढील काही सामन्यात खेळू शकणार नाही. इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूला शनिवारी सराव सत्रादरम्यान दुखापत झाली असून यामुळे तो सोमवारी झालेल्या पंजाब किंग्सविरुद्ध लढतीतही खेळू शकला नाही. यापूर्वी दि. 17 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध लढतीत मोईन अलीचा चेन्नई संघात समावेश होता. त्या लढतीत चेन्नईला 3 गडय़ांनी पराभव पत्करावा लागला होता. मागील हंगामात जेतेपद मिळवणाऱया चेन्नईकडून सातत्यपूर्ण योगदान दिलेल्या मोईन अलीला यंदा मात्र फारसा सूर सापडलेला नाही. आतापर्यंत त्याने 17.40 च्या सरासरीने 87 धावा केल्या तर 8 षटकात 68 धावांमध्ये तो एकही बळी मिळवू शकलेला नाही.