पहिल्या दिवशी 200 कार्सचे उत्पादन : नियम व अटीसोबत प्रकल्प सुरु
वृत्तसंस्था/ चेन्नई
सध्या देशात तिसऱया सत्रातील लॉकडाऊनचा कालावधी सुरु आहे. त्यामुळे या सत्रात काही प्रमाणात नियम अटींच्या शर्तीवर कारखानदारांना आपली उत्पादने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याची दखल घेऊन काही प्रमाणात विविध कंपन्या आपल्या उत्पादनांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये ह्युंडाई इंडियाने चेन्नईमधील प्रकल्पात उत्पादन सुरु केले आहे. एकाच दिवसात 200 कार्सचे उत्पादन केल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
हय़ुंडाई कंपनीने दिलेल्या माहितीनुसार उत्पादन प्रकल्पाच्या ठिकाणी कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची आरोग्याची काळजी, सामाजिक अंतर व अन्य नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले आहे.
एप्रिलमधील कामगिरी
मागील 23 मार्चपासून कोरोनाच्या वाढत्या धास्तीमुळे देशभरात लाकडाऊनची घोषणा सरकारने केली आहे. परंतु या बंदच्या कालावधीत कंपनीचे एकही वाहन विक्री झाले नाही. याच कालावधीत हय़ुंडाईने 1341 वाहनांची निर्यात केली आहे. नव्याने उत्पादनाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाल्यामुळे आगामी काळात वाहन क्षेत्रात तेजीचे वारे वाहणार असल्याचा विश्वास कंपनीला आहे.