फोंडाघाट येथील घटना : चोरटय़ाचा साथीदार पसार : दुचाकीने पळणाऱयांचा मोटारीने केला पाठलाग : चोरलेली चेनही हस्तगत; तीन दिवसाची कोठडी
कणकवली:
काही खाण्याच्या वस्तू घेण्याच्या बहाण्याने हॉटेल गाठत, चक्क हॉटेल मालकाच्या गळय़ातील चेन हिसकावून, ती घेऊन पळण्याचा धाडसी प्रयत्न दोन चोरटय़ांनी केला. ही घटना फोंडाघाट येथे शुक्रवारी रात्री 10.30 वा. सुमारास घडली. हॉटेल मालक व ग्रामस्थांनी कारने पाठलाग करून दुचाकीवरून पळणाऱया या चोरटय़ांना घाटमार्गात पकडले. मात्र, त्यातील एकजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
दीपक आनंद सूर्यवंशी (19) असे पकडलेल्या चोरटय़ाचे नाव असून त्याचा साथीदार अर्जुन राजा वारके (दोघेही रा. कसबा तारळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) हा पसार झाला. मात्र, पोलिसांनी चोरटय़ांकडील दुचाकी जप्त केली असून अटकेतील दीपक याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
चोरटे दुचाकीने आले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठोबा उर्फ सचिन राधाकृष्ण तायशेटे (40, फोंडाघाट – बाजारपेठ) यांचे फोंडाघाट – बाजारपेठ येथे साई हॉटेल व कोल्ड्रिंक्स या नावाचे दुकान आहे. त्यांच्याकडे दूध एजन्सीही आहे. हे दुकान सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत उघडे असते. तर रात्री 10.30 वा. सुमारास त्यांच्याकडे दुधाची गाडी येते. त्यासाठी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सचिन हे दुकानाचे शटर अर्धे उघडे ठेवून दुधाच्या गाडीची वाट बघत होते. याचवेळी त्यांच्या दुकानासमोर पल्सर दुचाकी (एमएज09 ईआर 7271) येऊन थांबली.
चेन हिसकावून पळाले
यातील एकाने हेल्मेट घातले होते. दुचाकीवरून उतरलेले दोन्ही युवक सचिन यांच्या दुकानात आले. त्यांनी चणे, वेफर्स मागितले. सचिन यांनी त्यांना हे जिन्नस दिले. मात्र, चोरटय़ांनी ‘प्लान’ केल्यानुसार काही उंचावर असलेली जेम्सची पाकिटे मागितली. त्यासाठी सचिन हे स्टुलावर चढून जेम्सची पाकिटे काढत असतानाच हेल्मेट न घातलेल्या युवकाने म्हणजेच दीपक याने सचिन यांच्या गळय़ातील सोन्याची चेन खेचली. त्यात चेन तुटून त्याचा साईबाबांच्या लॉकेटसह एक तुकडा त्याच्या हाती लागला. त्यानंतर दोन्ही चोरटे चपळाईने दुचाकीवर बसून राधानगरीच्या दिशेने सुसाट जाऊ लागले.
लागलीच पाठलाग
सचिन यांचे मित्र अण्णा उर्फ शंकर पारकर यांची स्विफ्ट कार त्यांच्या दुकानाजवळच उभी होती. सचिन यांनी त्यांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर सचिन, अण्णा यांच्यासह गणेश तावडे, संतोष हळदिवे यांनी कारने दुचाकीचा पाठलाग सुरू केला. अखेरीस घाटमार्गात दाजीपूरच्या खिंडीनजीक त्यांनी दुचाकीस गाठले. मात्र, दुचाकी चालविणारा अर्जुन वारके हा अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी तेथेच सोडून पसार झाला. तर दीपक हा देखील पलायनाचा प्रयत्न करत होता. मात्र, सचिन व सोबतच्यांनी त्याला पकडले. यावेळच्या झटापटीत दीपकच्या ओठांना दुखापतही झाली.
चेन, लॉकेटही सापडले
पकडल्यानंतर विचारणा केली असता त्याने आपले, साथीदाराचे नाव – गाव सांगितले. त्याला फोंडाघाट – चेकपोस्ट येथे आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात चेनचा तुकडा व साईबाबांचे लॉकेट मिळून आले. अखेरीस दोन्ही चोरटय़ांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
टेहळणी करून चोरीचा प्रयत्न!
घटना घडण्याच्या दोन तासापूर्वी हे दोन्ही चोरटे फोंडाघाट बाजारपेठेत घुटमळत असल्याचे अनेकानी पाहिले होते. त्यामुळे त्यांनी परिसराची टेहळणी केलेली असावी. अखेरीस रात्रीच्या सुमारास वर्दळ शांत झाल्यानंतर त्यांनी चोरीचा प्रयत्न केला असावा. दीपक याची तपासणी केली असता त्याच्या खिशात फक्त 100 रुपये आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले.
चोरटय़ास पोलीस कोठडी
शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पसार असलेल्या चोरटय़ाचा शोध घेणे, चोरटय़ांनी यापूर्वी चोऱया केल्या आहेत का याची माहिती घेणे आदींच्या तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.