वृत्तसंस्था/ पॅरिस
दहा हजार मीटर्सचा विश्वविजेता युगांडाच्या जोशुआ चेपतेगेईने मोनॅकोमध्ये झालेल्या डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेत शानदार पुनरागमन करताना 5000 मीटर्सचा नवा विश्वविक्रम नोंदवला. चेपतेगेईने या शर्यतीत 12:35:36 मिनिटाचा हा नवा विश्वविक्रम नोंदवताना इथिओपियाचा महान धावपटू केनेनिसा बेकेलेचा 2004 मधील 12:37:35 मिनिटांचा विक्रम मोडित काढला.
गेल्या फेब्रुवारीत कोव्हिड 19 च्या आधी या 23 वर्षीय धावपटूने मोनॅकोतच 10,000 मी.चा विक्रम प्रस्थापित केला होता. या शर्यतीसाठी 5000 प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. ‘मोनॅको माझ्यासाठी खास ठिकाण असून विश्वविक्रम नोंदवण्याचा पराक्रम माझ्याकडून याच ठिकाणी होतो, असे मला वाटते,’ असे त्याने म्हटल्याचे डायमंड लीगने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. ‘यावर्षी स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. कारण महामारीमुळे सर्वच जण घरीच आहेत. असे असले तरी स्वतःला प्रेरित ठेवणे आवश्यक असते. मला यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. माझ्याकडे योग्य स्टाफ आणि प्रशिक्षक असल्याने मला हे शक्य झाले. तसे पाहिल्यास माझे वास्तव्य युरोपमध्येच जास्त आहे,’ असेही तो म्हणाला.