वृत्तसंस्था / व्हॅलेन्सिया
युगांडाचा धावपटू जोशुआ चेपतेगेई आणि इथिओपियाची महिला धावपटू लिटेसेनबेट गिडेने बुधवारी येथे झालेल्या व्हॅलेन्सिया मॅरेथॉनमध्ये दीर्घ पल्ल्याच्या विभागात नवे विश्व़विक्रम नोंदविले. चेपतेगेईने पुरूषांच्या 10,000 मी. तर गिडेने महिलांच्या 5,000 मी. विभागामध्ये हे नवे व़िश्वविक्रम केले आहेत.
व्हॅलेन्सिया मॅरेथॉनमधील बुधवारचा दिवस विश्वविक्रम करणारा ठरला. पुरूषांच्या 10,000 मी. धावण्यांच्या शर्यतीत चेपतेगेईने 26 मिनिटे 11.02 सेकंदाचा अवधी घेत नवा विश्वविक्रम नोंदविताना 2005 साली इथिओपियाच्या बेकेलीने नोंदविलेला 26 मिनिटे 17.53 सेकंदाचा विश्वविक्रम मागे टाकला. गेल्यावर्षी दोहा येथे झालेल्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत 24 वर्षीय चेपतेगेईने पुरूषांच्या 10,000 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते. गेल्या डिसेंबरमध्ये व्हॅलेन्सियात झालेल्या 10 कि.मी. पल्ल्याच्या रोडरेसमध्ये चेपतेगेईने तब्बल 10 वर्षे अबाधित राहिलेला विश्वविक्रम मागे टाकला होता.
महिलांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यती इथिओपियाच्या गिडेने 14 मिनिटे, 6.62 सेकंदाचा अवधी घेत नवा विश्व विक्रम नोंदविताना 2008 साली ओस्लो येथे झालेल्या स्पर्धेत इथिओपियाच्या दिबाबाने नोंदविलेला 14 मिनिटे, 11.15 सेकंदाचा विश्वविक्रम मागे टाकला.