सेन्सेक्समध्ये 363 अंकांची तर निफ्टीत 122 अंकांची वाढ
नवी दिल्ली
चौफेर खरेदीमुळे महिन्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक दोन्ही तेजीसह बंद झाले आहेत. बाजाराला रियल्टी, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील समभागांचा चांगला आधार मिळाला होता.
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 363 अंकांच्या वाढीसह 52,950.63 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 122 अंकांच्या तेजीसह 15,885.15 अंकांवर बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
सेन्सेक्समधील 30 पैकी 21 समभाग तेजीसह बंद झाले, ज्यात टायटनचे समभाग 3.44 टक्के वाढीसह बंद झाले. याप्रमाणेच ऍक्सिस बँकेचे समभागदेखील 2 टक्के वाढीसह बंद झाले. टाटा स्टीलचा समभाग मात्र 1.37 टक्के घटलेला दिसला. रियल्टी समभागात मोठय़ा प्रमाणात खरेदी दिसून आली. निफ्टी रियल्टी निर्देशांक 4.79 टक्के वाढीसह 417 अंकांवर बंद झाला, ज्यात ओबेरॉय रियल्टीचा समभाग सर्वाधिक 10.65 टक्के तेजीत होता. यादरम्यान लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 237.85 लाख कोटींवर पोहचले आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 66 अंकांच्या नुकसानीसह 52,586 वर आणि निफ्टी निर्देशांक 15 अंकांच्या घसरणीसह 15,763 बंद झाला होता. निर्मिती क्षेत्राचा निर्देशांक (पीएमआय) जुलैमध्ये वाढून 55.3 वर पोहचला आहे जो जूनमध्ये 48.1 इतका होता. याचाच अर्थ निर्मिती क्षेत्रात परिस्थितीत सुधारणा होत आहे, असे मानायला हरकत नाही. बाजारात टायटनचा समभाग 3.58 टक्के, श्री सिमेंट 3.52, बीपीसीएल 3.05, अदानी पोर्टस् 2.93 आणि आयशर मोटर्सचे समभाग 2.89 टक्के इतके वाढलेले दिसले. दुसरीकडे युपीएल, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स आणि टेक महिंद्रा यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले.