आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आवाहन : कंग्राळीतील दोन तलावांच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन : दोन्ही तलावांसाठी 3.40 कोटी मंजूर
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
राजमाता जिजाऊ होत्या म्हणून त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. शिवाजी महाराजांमुळे देशात हिंदू संस्कृती टिकून आहे. शिवरायांनी जातीयवाद, भाषावाद न मानता हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून तुम्ही विकासाच्या माध्यमातून गावचे नंदनवन करण्याचे आवाहन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
कंग्राळी बुद्रुक गावाजवळील व शाहूनगरजवळील किगदी तलाव या तलावांचे सौंदर्यीकरण कामांचे भूमिपूजन आमदार हेब्बाळकर यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. माजी अध्यक्ष दत्ता पाटील होते.
3 कोटी 40 लाख मंजूर
गावाजवळील तलाव सौंदर्यीकरणासाठी 1 कोटी 10 लाख 12 हजार 384 रुपये तर किगदी तलावासाठी 2 कोटी 22 लाख 7 हजार 384 रुपये असे एकूण 3 कोटी 40 लाख रुपये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये गणपती विसर्जन कुंड, धोबी घाट, जनावरांसाठी पिण्याचे पाणी, मॉर्निंग वॉकसाठी रस्ता आदी सुविधा करण्यात येणार असून 12 ते 13 कोटींची विकासकामे राबविण्याचेही त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर ग्रा. पं. सदस्य अनिल पावशे, जयराम पाटील, यल्लोजी पाटील, बंदेनवाज सय्यद, पीडीओ जी. आय. बर्गी, ज्येष्ठ निवृत्त जवान, विठ्ठल पाटील, हभप गोपाळ पाटील, हभप राजू कावळे, आयुबखान पठाण, आनंद पम्मार, तानाजी पाटील, उमेश पाटील, रोजगार महिला प्रमुख वनिता कागणकरसह कंग्राळी बुद्रुक व गौंडवाडमधील ग्रा. पं. सदस्य व सदस्या उपस्थित होत्या.
ग्रा. पं. च्या नूतन महिला सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य नवनाथ पुजारी व इतरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लक्ष्मी-सरस्वती फोटो पूजन ग्रा. पं. माजी अध्यक्ष विठ्ठल पुजारी, ता. पं माजी सदस्य हणमंत पुजारी, हभप बाबू पाटील आदींनी केले. श्रीफळ हभप राजू कावळे यांनी वाढविले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, दत्ता पाटीलसह सर्व नूतन सदस्य व सदस्यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, मराठी शाळा सुधारणा बांधकाम कमिटी, वारकरी भजनी मंडळ, महिला रोजगार संघ, विविध संघ, युवक मंडळ आदींनी आमदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मराठी शाळा इमारतीच्या नवीन बांधकामासाठी निधी मंजूर करण्यासाठी आमदार हेब्बाळकर यांना एसडीएमसी सदस्य मारुती अष्टेकर, शंकर कोनेरी, मल्लाप्पा पाटील, परशराम बसरीकट्टी, निरंजन जाधव, राजू मन्नोळकर आदींनी निवेदन दिले.
घरोघरी पिण्याचे पाणी देणार
कंग्राळी गावाला घरोघरी पिण्याचे शुद्ध पाणी देणार असल्याचे आमदारांनी सांगितले. यावेळी हभप गोपाळ पाटील व हभप राजू कावळे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाला कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड येथील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रा. पं. माजी अध्यक्ष गजानन पाटील यांनी केले. प्रशांत पवार यांनी आभार मानले.