वार्ताहर/ धामणे
छत्रपती शिवाजी महाराज कर्तृत्ववान योद्धे होते. मुघल साम्राज्यासमोर मान न झुकवता मूठभर मावळय़ांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र समजून घेतल्याशिवाय हिंदुस्थानचा इतिहास समजून घेता येणार नाही, असे विचार प्राध्यापक डॉ. विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.
धामणे येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळय़ाचे रविवारी उत्साही वातावरणात व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण झाले. यावेळी गायकवाड बोलत होते. अध्यक्षस्थानी येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे प्रमुख बंडू केरवाडकर होते. ग्रा. पं. अध्यक्षा करेव्वा नाईक, उपाध्यक्षा गीता येळ्ळूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विनोद गायकवाड यांच्या हस्ते गणेश पूजनाने करण्यात आली. येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गायिले. त्यानंतर शिवपुतळय़ाला अभिषेक घालण्यात आला. विधिवत पूजन झाल्यावर बिल्डिंग कॉन्ट्रक्टर अशोक जायाण्णाचे यांच्या हस्ते पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर पूजन करून उद्योजक अमर अकनोजी यांनी ध्वज चढविला.
गायकवाड पुढे म्हणाले, शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेवर व स्त्रियांवर अत्याचार करणाऱयांना राजे कठोर शासन करत. 17 व्या शतकाचा इतिहास समजावून घेण्यासारखा असून शिवाजी महाराजांचा लढा हा आपल्या संस्कृतीसाठी होता.
यानंतर प्रतिष्ठानच्यावतीने धामणे गावचे सुपुत्र सचिन बाळेकुंद्री यांनी 2020-21 च्या शिवप्रभू दौडमध्ये ध्वजाचा प्रथम मान मिळविल्याबद्दल प्रतिष्ठानच्या अध्यक्षांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे येथील कृषी पत्तीन सोसायटीचे चेअरमन एम. डी. पाटील यांना कर्नाटक सहकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्राम पंचायत सदस्य, गावातील देवस्की पंच कमिटी, सर्व शाळांचे शिक्षक, पतसंस्थांच्या सदस्यांचा तसेच युवक मंडळांच्या पदाधिकाऱयांचा आणि शिवपुतळय़ाला देणगी दिलेल्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी धामणे, ब्रह्मलिंगहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील भजनी मंडळांच्यावतीने सामुदायिक भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री जय भवानी गोंधळी जागर संघ संकेश्वर यांचा गोंधळाचा कार्यक्रम पार पडला.
हा सोहळा पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य विजय बाळेकुंद्री, ग्रा. पं. सदस्य कुमाण्णा कोमाण्णाचे, आनंद जायाण्णाचे, बाळू केरवाडकर, शिवाजी पाटील, दशरथ येळ्ळूरकर, प्रभाकर पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला धामणे विभाग शिवप्रतिष्ठानचे प्रमुख महेश पाटील, यल्लाप्पा रेमाण्णाचे, बसवंत बाळेकुंद्री, किरण चतुर, उमेश डुकरे, सुभाष मरगाण्णाचे त्याचप्रमाणे शिवप्रतिष्ठानचे व गावातील सर्व युवक मंडळांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळू केरवाडकर यांनी केले. विजय बाळेकुंद्री यांनी आभार मानले.