ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगावर आर्थिक मंदीची गडद छाया असून, 2009 मध्ये आलेल्या जागतिक मंदीपेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होण्याचे सूतोवाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी केले आहे.
एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना जॉर्जीव्हा यांनी जागतिक मंदीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, कोरोना या जागतिक महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला आहे आणि विकसनशील देशांना मदतीसाठी मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. 50 हून अधिक देश लॉकडाऊन असल्याने अनेक कंपन्या दिवाळखोर होण्याची आणि त्यानंतर कर्मचाऱयांना नोकरीवरून काढण्याचीही लाट येईल, ही प्रमुख चिंता आहे. त्यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांना जवळपास 2.5 ट्रिलियन डॉलरची गरज आहे. जागतिक स्तरावर कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यास यश आले, तर 2021 मध्ये या मंदीतून सावरणे शक्मय होईल, असेही त्यांनी सांगितले.