सलग 4 विजयांची आरसीबीची चेन ब्रेक
मुंबई / वृत्तसंस्था
फलंदाजीत शेवटच्या षटकात 37 धावा झोडपून देखील समाधान न झालेल्या रविंद्र जडेजाने नंतर गोलंदाजीतही 3 बळी घेतल्यानंतर त्याच्या या वादळात आरसीबीच नव्हे तर कोणताही संघ प्रतिस्पर्धी असता तरी नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहिला नसता! जडेजाच्या खऱया अर्थाने साकारलेल्या या अष्टपैलू खेळामुळे चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीचा 69 धावांनी अक्षरशः धुव्वा उडवला आणि विराटसेनेच्या सलग 4 विजयांची चेन येथे ब्रेक केली.
जडेजाने अवघ्या 28 चेंडूत 4 चौकार, 5 षटकारांसह 62 धावांची आतषबाजी केल्यानंतर गोलंदाजीत वरचष्मा गाजवला आणि 4 षटकात 1 निर्धाव व 13 धावात 3 बळी असे पृथक्करण नोंदवले. याशिवाय, त्याने ख्रिस्तियनला थेट थ्रोवर धावचीत करत क्षेत्ररक्षणातही आपला डंका वाजवला.
वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 191 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात आरसीबीला त्यांचे स्टार फलंदाज गडगडल्यानंतर हे आव्हान अजिबात पेलवले नाही आणि निर्धारित 20 षटकात 9 बाद 122 धावांवर समाधान मानावे लागले. 16 षटकात 9 बाद 103 अशा बिकट स्थितीत सापडलेल्या आरसीबीने 20 षटकांचा कोटा पूर्ण केला, हीच त्यांच्यासाठी एकमेव दिलासादायक बाब ठरली.
विजयासाठी 192 धावांचा पाठलाग करताना आरसीबीचे डीव्हिलियर्स व ग्लेन मॅक्सवेल हे अव्वल फलंदाज जडेजाचे सावज ठरले आणि त्यानंतर त्यांच्या आव्हानातील जानच निघून गेली. वास्तविक, पहिल्या 5 षटकात आरसीबीने अर्धशतक पार केले होते. पण, त्यानंतर त्यांची घसरगुंडी सुरु झाली. देवदत्त पडिक्कलने येथे 15 चेंडूत जलद 34 धावांचे योगदान दिले. अनुभवी दक्षिण आफ्रिकन लेगस्पिनर इम्रान ताहीरने 16 धावात 2 बळी घेत जडेजाला समयोचित साथ दिली.
फलंदाजीतही जडेजाचा झंझावात
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 4 बाद 191 धावांचा डोंगर रचला त्यात जडेजाने डावातील शेवटच्या हर्षल पटेलच्या षटकात 4 सलग गगनचुंबी षटकार खेचले, ते मुख्य वैशिष्टय़ ठरले. शेवटचे षटक टाकण्यापूर्वी हर्षल पटेलचे गोलंदाजी पृथक्करण 14 धावात 3 बळी असे होते. पण, या षटकात जडेजाने 37 धावांची आतषबाजी केल्यानंतर हर्षलचे पृथक्करण 4 षटकात 51 धावात 3 बळी असे झाले. डावाच्या पहिल्या टप्प्यात डय़ू प्लेसिसने 41 चेंडूत 50 तर ऋतुराज गायकवाडने 33 धावांचे योगदान दिले.
ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी
या लढतीत पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या जडेजाला खाते उघडण्यापूर्वीच जीवदान मिळाले आणि याचा त्याने पुरेपूर लाभ घेतला. येथे हर्षलच्या एकाच षटकात 37 धावांची आतषबाजी करत त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाशी देखील बरोबरी साधली. 2011 च्या आयपीएल आवृत्तीत त्यावेळी आरसीबीकडून खेळणाऱया गेलने कोची टस्कर्स केरळविरुद्ध एकाच षटकात 37 धावांची आतषबाजी केली होती.
धावफलक
चेन्नई सुपरकिंग्स ः ऋतुराज गायकवाड झे. जेमिसन, गो. चहल 33 (25 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. ख्रिस्तियन, गो. पटेल 50 (41 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), सुरेश रैना झे. पडिक्कल, गो. पटेल 24 (18 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), अम्बाती रायुडू झे. जेमिसन, गो. पटेल 14 (7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), रविंद्र जडेजा नाबाद 62 (28 चेंडूत 4 चौकार, 5 षटकार), महेंद्रसिंग धोनी नाबाद 2 (3 चेंडू). अवांतर 6. एकूण 20 षटकात 4 बाद 191.
गडी बाद होण्याचा क्रम
1-74 (ऋतुराज, 9.1), 2-111 (रैना, 13.4), 3-111 (प्लेसिस, 13.5), 4-142 (अम्बाती रायुडू, 17.3).
गोलंदाजी
मोहम्मद सिराज 4-0-32-0, काईल जेमिसन 3-0-31-0, यजुवेंद्र चहल 3-0-24-1, नवदीप सैनी 2-0-27-0, हर्षल पटेल 4-0-51-3, डॅन ख्रिस्तियन 2-0-12-0, वॉशिंग्टन सुंदर 2-0-13-0.
आरसीबी ः विराट कोहली झे. धोनी, गो. करण 8 (7 चेंडूत 1 चौकार), देवदत्त पडिक्कल 34 (15 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), वॉशिंग्टन सुंदर झे. गायकवाड, गो. जडेजा 7 (11 चेंडूत 1 षटकार), ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. जडेजा 22 (15 चेंडूत 3 चौकार), एबी डीव्हिलियर्स त्रि. गो. जडेजा 4 (9 चेंडू), डॅन ख्रिस्तियन धावचीत (जडेजा) 1 (3 चेंडू), काईल जेमिसन धावचीत (इम्रान ताहीर) 16 (13 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), हर्षल पटेल त्रि. गो. इम्रान ताहीर 0 (8 चेंडू), नवदीप सैनी झे. रैना, गो. ताहीर 2 (4 चेंडू), यजुवेंद्र चहल नाबाद 8 (21 चेंडू), मोहम्मद सिराज नाबाद 12 (14 चेंडूत 1 षटकार). अवांतर 8. एकूण 20 षटकात 9 बाद 122.
गडी बाद होण्याचा क्रम
1-44 (विराट, 3.1), 2-54 (देवदत्त, 4.6), 3-65 (वॉशिंग्टन सुंदर, 6.2), 4-79 (मॅक्सवेल, 8.5), 5-81 (ख्रिस्तियन, 9.4), 6-83 (डीव्हिलियर्स, 10.1), 7-89 (हर्षल पटेल, 11.6), 8-94 (नवदीप, 13.1), 9-103 (जेमिसन, 15.6).
गोलंदाजी
दीपक चहर 2-0-25-0, सॅम करण 4-0-35-1, शार्दुल ठाकुर 4-0-11-1, रविंद्र जडेजा 4-1-13-3, इम्रान ताहीर 4-0-16-2, डेव्हॉन ब्रेव्हो 2-0-19-0.
जर जडेजाचा तो झेल सोडला नसता तर?
वॉशिंग्टन सुंदरच्या डावातील 15 व्या षटकात डीप मिडविकेटवर तैनात डॅन ख्रिस्तियनने जीवदान दिले, तेव्हा जडेजाने खातेही उघडले नव्हते. ख्रिस्तियनचा गुडघ्यावर टेकत झेल घेण्याचा प्रयत्न यावेळी सपशेल फसला. नेमके हेच जीवदान आरसीबीसाठी प्रचंड महागडे ठरले आणि जडेजाने याचा पुरेपूर लाभ घेत अवघ्या 28 चेंडूतच नाबाद 62 धावा कुटल्या.
शेवटच्या षटकात जडेजाने कुटल्या 5 षटकारांसह 37 धावा!
या लढतीत चेन्नईने 19 व्या षटकाअखेर 4 बाद 154 धावा नोंदवल्या. मात्र, शेवटच्या षटकात जडेजा क्रीझवर आला आणि त्याने 5 षटकार, 1 चौकारांसह तब्बल 37 धावा कुटल्या आणि या सामन्याचे सर्व चित्रच पालटून टाकले. जडेजाने पहिले 3 चेंडू षटकारासाठी पिटाळून लावले आणि यातील तिसरा चेंडू नोबॉल असल्याने फ्री हिट मिळाल्यानंतर पुढील चेंडूवरही आणखी एक षटकार वसूल केला. यामुळे 3 चेंडूत 4 षटकारांसह 25 धावांची आतषबाजी त्याने येथे केली. पुढेही चौथ्या चेंडूवर 2, पाचव्या चेंडूवर षटकार व शेवटच्या चेंडूवर चौकार, अशी धुवांधार फटकेबाजी करत त्याने चाहत्यांसाठी सुपरसंडेची अनुभूती दिली.