वृत्तसंस्था/ पुणे
एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत येथे गुरुवारी बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळविण्यात आलेल्या उपांत्य सामन्यात चीनने पेनल्टी शूटआऊटमध्ये जपानचा 4-3 अशा गोलफरकाने धक्कादायक पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता या स्पर्धेत चीन आणि कोरिया यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
गुरुवारच्या उपांत्य सामन्यात निर्धारित वेळेत तसेच त्यानंतर जादा वेळेच्या कालावधीत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. या सामन्यात चीन संघाची गोलरक्षक झू आणि कर्णधार वेंग शेनशेन यांची कामगिरी दर्जेदार झाली. चीनच्या महिला संघाने आतापर्यंत ही स्पर्धा आठवेळा जिंकली आहे. आता ते विक्रमी नवव्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. उपांत्य सामन्यात दोनवेळा चीनचा संघ पिछाडीवर राहिला होता. या सामन्यातील दिलेल्या जादा वेळेतील शेवटच्या मिनिटाला वेंग शेनशेनने चीनचा दुसरा गोल करून जपानशी बरोबरी साधली. त्यामुळे पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये चीनची गोलरक्षक झू हिने जपानचे दोन फटके अडविले. चीनच्या कर्णधार वेंग शेनशेनने स्पॉट किकवरील पाचव्या फटक्मयावर आपल्या संघाचा निर्णायक गोल नोंदवून जपानचे आव्हान संपुष्टात आणले. चीनने 2006 साली या स्पर्धेचे शेवटचे विजेतेपद मिळविले होते.
या सामन्यातील सहाव्या मिनिटाला रुका नोरीमेटूने जपानचे खाते उघडले. 26 व्या मिनिटाला युकीने हेडरद्वारे जपानचा दुसरा गोल करण्याचा प्रयत्न केला. पण चीनच्या गोलरक्षकाने हा हल्ला थोपविला. मध्यंतरावेळी जपानने चीनवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धातील खेळाच्या पहिल्याच मिनिटाला चेंग शूने चीनचा पहिला गोल केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. जपानने जादा वेळेमध्ये आपला दुसरा गोल केला. जपानचा हा गोल युकीने नोंदविला. या जादा वेळेच्या कालावधीतील शेवटच्या मिनिटाला चीनने आपला दुसरा गोल करून पुन्हा सामना बरोबरीत आणल्यानंतर पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला आणि चीनने जपानचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 2008 नंतर या स्पर्धेत चीनने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.