एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले, 54 प्रवासी बचावले
जबलपूर / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशमधील जबलपूरच्या डुमना विमानतळावर शनिवारी मोठी विमान दुर्घटना टळली. एअर इंडियाचे दिल्ली-जबलपूर विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरल्याने हा अपघात झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यावेळी विमानामध्ये एकूण 54 जण होते. पायलटच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तथापि, विमानाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दिल्लीहून जबलपूरमध्ये दाखल झालेले विमान उतरत असताना ते धावपट्टीवर घसरले. या दुर्घटनेदरम्यान सदर विमान धावपट्टीबाहेर गेले. या अपघातात विमानाच्या लँडिंग गियर आणि पंखांचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन दल आणि इतर बचाव अधिकारी घटनास्थळी पोहोचले. विमानतळ प्रशासनाने घटनास्थळ सील करून सर्व प्रवाशांना विश्रामगृहात नेले. मदतकार्यावेळी विमानतळ बंद करण्यात आले होते. सायंकाळपासून पुन्हा सर्व सेवा वेळापत्रकाप्रमाणे सुरू झाल्याची माहिती विमानतळ प्राधिकरण प्रशासनाने दिली.