ऑनलाईन टीम / पुणे :
जलतरंग वाद्यातून हळूवारपणे निर्माण होणारे सूर… त्याला इतर वाद्यांची मिळालेली सुरेल साथ… त्यामधून उमटलेला तरंग आणि त्याला रसिकांनी दिलेली दाद अशा संगीतमय वातावरणामध्ये वाद्याच्या निनादातून जलतरंग रसिकांनी अनुभवला. जलतरंग वादनाला गायनाची मिळालेली जोड अनुभवताना रसिक मंत्रमुग्ध झाले होते.निमित्त होते, स्वरसंपदा संगीत अकादमीच्यावतीने पाचव्या वाद्यमैफलीअंतर्गत टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात ज्येष्ठ जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर आणि गायिका संपदा वाळवेकर यांच्या जलतरंग या संगीतमय कार्यक्रमाचे. कार्यक्रमाची सुरुवात स्वरसंपदा संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी हीच आमची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे… या प्रार्थनेने केली. चिमुकल्यांच्या निरागस स्वरांनी केलेल्या या माणुसकीच्या प्रार्थनेने रसिक भारावून गेले. यानंतर मिलिंद तुळाणकर यांचे जलतरंग वादन झाले. जलतरंग वादनातून निर्माण होणारे ध्वनी आणि गायकांच्या अवीट स्वरांमध्ये रंगलेली जुगलबंदी यांनी मैफलीला अनोखा रंग आणला. मिलिंद तुळाणकर यांनी सुरुवातीला राग पुरीया कल्याण मध्ये आलाप जोड सादर केली. त्यानंतर तीनतालमध्ये सादर केलेल्या बंदिशीला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. गायकांशी जुगलबंदी करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. चिनी मातीची भांडी आणि नायलॉनच्या काड्या यांच्या मदतीने तुळाणकर यांनी केलेल्या जलतरंगवादनाने रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला.