वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्र्यांनी मागितला अहवाल : म्हादईप्रकरणी कर्नाटककडून कणकुंबीत माती परीक्षण
प्रतिनिधी /पणजी
गोव्याच्या सिमेलगत कर्नाटक सरकारने कणकुंबी गावाजवळ माती परीक्षणासाठी मशिनरी व इतर यंत्रणा आणल्यानंतर आता गोवा सरकार पर्यायाने जलस्त्रोत खाते आणि त्याचे मंत्री सुभाष शिरोडकर जागे झाले असून खात्याच्या अधिकाऱयांनी तेथे भेट द्यावी तसेच अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत. हा अहवाल कधी येणार आणि गोवा सरकारतर्फे कोणती पावले उचलली जाणार ते महत्वाचे आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गोवा सिमेपासून सुमारे 500 मीटर अंतरावर कर्नाटक राज्य सरकारतर्फे माती परीक्षण सुरु करण्यात आले असून त्या भागात म्हादई नदीवर बंधारा बांधून कालवा काढण्याचा बेत आखण्यात आला आहे. म्हादईच्या विषयाकडे गोवा सरकारचे सातत्याने दुर्लक्ष झाले असून जलस्त्रोत खाते नेमके करते तरी काय? असा प्रश्न पडला आहे. म्हादईचा विषय गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असून कर्नाटकात कोणीतरी काहीतरी म्हादई नदीवर करतेय असे निदर्शनास आणल्या नंतरच हे खाते जागे होत असल्याचे समोर आले आहे.
सदर खात्याने किंवा त्यांच्या अधिकारी वर्गाने स्वतःहून म्हादईच्या विषयाकडे लक्ष देण्यास टाळाटाळ केल्याचे वारंवार दिसून आले आहे. पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी काही गोष्टी उघड केल्यानंतरच हे खाते जागे होते तोपर्यंत त्या खात्याला कर्नाटकात म्हादईप्रश्नी काय चालते त्याचा पत्ताच नसतो असेही स्पष्ट झाले आहे. जलस्त्रोत खात्याचे अधिकारी नियमितपणे म्हादई क्षेत्रास भेट देत नाहीत, माहिती घेत नाहीत हेच वांरवार दिसून आले आहे.