22 महिलांमागे प्रत्येकी 1 ब्रेस्ट कॅन्सरची शिकार
प्रतिनिधी / कोल्हापूर
गेल्या काही वर्षात कॅन्सरच्या रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोनाच्या मृत्यूदरापेक्षा कॅन्सरने मृत्यूचा दर अधिक आहे. सद्यस्थितीत 22 महिलांमागे एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होत आहे. 74 पुरूषांमागे एकाला ओरल कॅन्सर होत आहे. बदलती जीवनशैली याला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे जागतिक कर्करोग दिनी `आय एम.. अँड आय विल..’ या घोषवाक्याद्वारे जनजागृती केली जात आहे.
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यातही जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांत हे प्रमाण अधिक आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जनजागृती आणि आरोग्य तपासणी आवश्यक बनली आहे. औद्योगिक वसाहतीत, कारखान्यांत कार्यरत कामगारांमध्ये गुटखा, तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पुरूषांमध्ये तोंडाचा कर्करोग असलेल्यांची संख्या वाढत आहे. सरासरी 74 पुरूषांमागे एकामध्ये हा कर्करोग दिसून येत आहे. एकट्या कोल्हापूर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आठ वर्षांत 40 हजार कर्क रूग्णांवर उपचार झाले आहेत.
कॅन्सर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयात होऊ शकतो, कॅन्सर विविध प्रकारचे आहेत. प्रामुख्याने पुरूषांमध्ये ओरल तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. पण यासंदर्भात आपल्याकडे फारसे गांभीर्य दिसत नाही. कॅन्सरला बदलती जीवनशैलीही कारणीभूत ठरली आहे. दहा वर्षांपुर्वी 60 ते 70 वयोगटात कॅन्सरचे रूग्ण अधिक होते, नेमके याउलट चित्र सध्या दिसत आहे. चाळीस वर्षांखालील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर अधिक असणे, हा धोक्याचा इशारा आहे.
ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभुत ठरतोय ब्रेस्ट फिडींगचा गैरसमज
गेल्या काही वर्षात विवाहाचे वय वाढले आहे. अनुवंशिकता, लवकर मुल न होऊ देणे, एकाच मुलावर ऑपरेशन होत आहेत. त्यातून बाळ जन्माला आल्यास त्याला स्तनपान करण्यास टाळाटाळ करणे. वास्तविक बाळाला आईने किमान दीड वर्षे स्तनपान करणे आवश्यक आहे. त्यामुळे तिला ब्रेस्ट कॅन्सरचा धोका निम्म्याने कमी होतो. पण आपल्याकडे सुडौलता राखण्याचा गैरसमज असल्याने स्तनपानाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो आहे. याशिवाय उशिरा विवाह झाल्याने पोटाचा घेर वाढतो. तसेच स्थुलताही कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे 2025 पर्यत महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर तर पुरूषांमध्ये ओरल कॅन्सरचे रूग्ण सर्वाधिक असतील, असा इशारा डॉ. रेश्मा पवार यांनी दिला.