सेन्सेक्समध्ये 586 अंकांची घसरण, बँकिंग समभाग दबावाखाली
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोनाची तिसरी संभाव्य लाट, बँकिंग समभागांचा दबाव आणि जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणाचे सावट भारतीय शेअर बाजारावर सोमवारी दिसून आले. सेन्सेक्स 586 अंकांच्या घसरणीसह आणि निफ्टी 171 अंकांच्या घसरणीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
सोमवारी सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 586 अंकांच्या नुकसानीसह 52,553.40 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 171 अंकांच्या घसरणीसह 15,752.40 अंकांवर बंद झाला. तीन महिन्यानंतर एवढी मोठी घसरण सेन्सेक्समध्ये झाल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. सेन्सेक्स निर्देशांकाची सोमवारी सुरुवात घसरणीने झाली. बँकिंग समभागांच्या भावात झालेल्या घसरणीचा परिणाम सेन्सेक्सवर दिसून आला. सकाळीच 500 अंकाच्या घसरणीसह सेन्सेक्स निर्देशांक व्यवहार करत होता. दुपारपर्यंत निर्देशांक सावरत 52,761 अंकांवर होता.
दुसरीकडे आशियाई बाजारात विक्रीवर भर दिसत होता. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 577 अंक घसरणीसह 27505 वर जपानचा निक्केई निर्देशांक 361 अंकांच्या घसरणीसह 27641 वर तर कोरीयाचा कोस्पी निर्देशांक 29 अंकांच्या घसरणीसह 3247 अंकांवर व्यवहार करत होता.
एचडीएफसी व एडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, अक्सिस बँक व एसबीआय समभागांमध्ये विक्रीचा सिलसिला दिसल्याने बाजारात मोठय़ा घसरणीचा अंक सादर झाल्याचे पहायला मिळाले. एचडीएफसी बँकेचा तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने समभाग कमकुवत झाले. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जुलैमध्ये समभागांच्या विक्रीवरच भर दिला होता. गुंतवणूकदारांनी 4515 कोटी रुपयांचे समभाग विकल्याचे दिसले. बाजारात नफावसुली करून घेण्यावर अनेक गुंतवणूकदारांचा प्रयत्न दिसला. खरेदीच्या कारणामुळे समभागांचे भाव वाढले आहेत. म्हणूनच गुंतवणूकदार समभागांची विक्री करत नफावसुली करताना दिसत आहेत.
बाजारात रिलायन्स इंडस्ट्रिज, आयटीसी, टाटा स्टीलसह इतर दिग्गज कंपन्यांचे समभाग सोमवारी कमकुवत झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे एनटीपीसी व एचसीएलटेक यांचे समभाग तेजीत होते. शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 18 अंकांनी घसरत 53140 वर बंद झाला होता. शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांकाने 53290.81 ही सर्वोच्च अंकांची पातळी गाठली होती. तर निफ्टीनेही 15962 अंकांचा विक्रमी स्तर गाठला होता.