एचडीएफसी, रिलायन्सचे समभाग तेजीत : निफ्टी 14,500 च्या वर
वृत्तसंस्था / मुंबई
जागतिक बाजारातील तेजीच्या कलाचा प्रभाव हा देशातील शेअर बाजारांवर पडला आहे. मंगळवारी बीएसई सेन्सेक्सची झेप 800 अंकांवर पोहोचली आहे. दिवसभरातील नफा कमाईच्या जोरावर सेन्सेक्समधील सर्वाधिक वजनदार असणाऱया कंपन्यांपैकी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग चांगल्या तेजीसोबत बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीमुळे दिवसअखेर सेन्सेक्स 834.02 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 49,398.29 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 239.85 अंकांनी वधारत 14,521.15 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये मंगळवारी बजाज फिनसर्व्हचे समभाग सर्वाधिक 7 टक्क्यांनी तेजीत राहिले असून सोबत बजाज फायनान्स, एचडीएफसी, लार्सन ऍण्ड टुब्रो. आयसीआयसीआय बँक, सन फार्मा आणि एनटीपीसीचे समभाग मजबूत वृद्धीसोबत बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मात्र टेक महिंद्रा, आयटीसी आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
मागील दोन सत्रामध्ये झालेल्या मोठय़ा घसरणीची भरपाई अखेर मंगळवारी भरुन काढण्यात शेअर बाजाराला यश मिळाले आहे. यामध्ये जागतिक शेअर बाजारातील मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे देशातील शेअर बाजाराला मोठी झेप घेता आली असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या मजबूत संकेतामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला असल्याने आगामी काळात गुंतवणूकीकडे त्यांचा कल राहू शकतो, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
आशियातील अन्य बाजारांमध्ये मंगळवारी हाँगकाँग, सिओल आणि टोकीयो हे तेजीसोबत बंद झाले आहेत. दुसरीकडे शांघाय घसरणीत राहिले असून युरोपीयन बाजार प्रारंभी तेजीत होते.