सिंगापूर सलग दुसऱयांदा अव्वलस्थानी
वृत्तसंस्था/ जिनिव्हा
आयएमडी वर्ल्ड कॉम्पिटीटीव्हनेस मानांकन 2020 मध्ये अमेरिकेचे स्थान 7 अंकांनी घसरून 10 व्या क्रमांकावर पोहोचले आहे. इन्स्टीटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, स्वीत्झर्लंडकडून प्रसिद्ध नव्या मानांकनात सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे. सिंगापूरने सलग दुसऱया वर्षी पहिले स्थान पटकाविले आहे. त्याच्यासमोर डेन्मार्क आणि स्वीत्झर्लंड यासारख्या देशांचे आव्हान होते.
2018 मध्ये सिंगापुरने जागितक स्पर्धात्मकता मानांकनात अमेरिकेला पिछाडले होते. 2019 मध्ये अमेरिका तिसऱया स्थानी राहिला होता, परंतु यंदा अमेरिकेचे स्थान 7 अंकांनी घसरले आहे. भारत या यादीत 43 व्या स्थानावर आहे. 2019 मध्येही भारताला हेच स्थान प्राप्त झाले होते.
व्यापारयुद्धाचा फटका
कोरोना महामारीदरम्यान अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारविषयक अनिश्चितता वाढली आहे. चीनचे मानांकनही 6 अंकांनी घसरून 20 व्या स्थानी पोहोचले आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्धामुळे अर्थव्यवस्थांना नुकसान पोहोचल्याचे आयएमडीने म्हटले आहे.
63 देशांचे मानांकन
आयएमडीने 1989 मध्ये मानांकनास प्रारंभ केला होता. या प्रक्रियेत शेकडो मापदंड, डाटाच्या आधारावर 63 देशांच्या अर्थव्यवस्थेचे आकलन केले जाते. रोजगार, राहणीमानाचा खर्च, शासकीय खर्च, राजकीय स्थैर्य यासारखे मापदंड सामील आहेत. सिंगापूर, डेन्मार्क, स्वीत्झर्लंड, नेदरलँड आणि हाँगकाँगने जागतिक जोखिमीदरम्यान अर्थव्यवस्था उत्तमपणे सांभाळल्याचे आयएमडीने म्हटले आहे.
उत्तम अर्थव्यवस्था ठरली तारक
मजबूत व्यापार आणि गुंतवणूक, उत्तम शिक्षण आणि तांत्रिक पायाभूत सुविधेमुळे सिंगापुरने अग्रस्थान प्राप्त केले आहे. डेन्मार्क बळकट अर्थव्यवस्था, श्रमभांडवल, आरोग्य, शिक्षण व्यवस्था, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक, उत्पादकतेच्या आधारावर दुसऱया स्थानी आहे. तर स्वीत्झर्लंड आंतरराष्ट्रीय व्यापार, वैज्ञानिक क्षमता, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेच्या बळावर तिसऱया स्थानी राहिले आहे.