प्रतिनिधी/ बेळगाव
ज्या ठिकाणी सहसा कोणी जात नाही आणि विविध उपक्रमांसाठी तेथे फिरकतही नाही, अशा स्मशानभूमीमध्ये जायंट्स मेनने दिवाळी साजरी केली. स्मशानभूमीत प्रवेश करणे कोणाला आवडतच नाही. तिथे काही कर्मचारी असतात. परंतु ते स्वतः आनंदी राहू शकत असले तरी प्रत्यक्षात दुसऱयांच्या दु:खासाठीच ते जगत असतात. जायंट्स मेनमुळे यंदा स्मशानभूमीतही आनंदाचे वातावरण पसरले. निमित्त होते दिवाळीचे.
जायंट्स मेनने येथील कर्मचाऱयांसोबत फक्त दिवाळी साजरी केली असे नाही तर त्यांना गणवेश दिला. रोख रक्कम, फराळ, साबण, सुगंधी तेल आणि काही भेटवस्तूंचेही वाटप केले. याप्रसंगी संजय पाटील, विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, युनिट संचालक मदन बामणे, मनपाचे स्वच्छता निरीक्षक श्रवणकुमार कांबळे, धारवाडकर, माजी अध्यक्ष सुनील भोसले, प्रेमानंद गुरव, सचिव विजय बन्सूर, उपाध्यक्ष सुनील मुतगेकर, दिगंबर किल्लेकर आदी उपस्थित होते. सर्वच मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱयांना गौरविण्यात आले. यावेळी श्रवणकुमार कांबळे, धारवाडकर, संजय पाटील, मोहन कारेकर, मदन बामणे, प्रेमानंद गुरव यांनी आपले विचार व्यक्त करताना कोविड काळात मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याबद्दल येथील कर्मचाऱयांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव केला. या अनोख्या गौरवाने कर्मचारी भारावून गेले आणि जायंट्स मेनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.