कुबेर चषक 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव क्रिकेटर्स आयोजित 12 वर्षाखालील कुबेर चषक क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनादिवशी युनियन जिमखाना रेड संघाने रॉजर सीसी संघाचा, विजया सीए संघाने एमसीसीसी संघाचा, युनियन जिमखाना रेड संघाने एआर टू स्क्वेअर संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. एका रोमांचक सामन्यात एमसीसी मच्छे व निना संघादरम्यान सामना बरोबरीत राहिला. प्रथम कुरणे, शुभम खोत, सप्रित भाटी यांनी सामनावीर पुरस्कार पटकाविला.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे किरण बेनकट्टी यांच्या हस्ते यष्टीचे पूजन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परशराम पाटील, सचिन साळुंखे, प्रशांत लायंदर, गौतम बाळू प्रधान, सुनील देसाई, विठ्ठल राजन कारेकर, योगेश व संतोष आदी उपस्थित होते.
पहिल्या सामन्यात रॉजर सीसी संघाने प्रथम फलंदाजी करताना 18 षटकात सर्व बाद 69 धावा केल्या. त्यात अथर्व बेळगावकर व प्रज्वल पुजार यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. युनियन जिमखाना रेडतर्फे शुभम खोत व ओमकार चौगुले यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल जिमखानाने 18 षटकात 3 बाद 71 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. त्यात शुभम खोतने 29 तर सुमित भोसलेने 17 धावा केल्या. रॉजरतर्फे जतिन कणबरकर, लोहित राजगोळी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात विजया सीसीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 185 धावा केल्या. त्यात स्वाती भाटीने 28 तर शौनक कोलेने 30 धावा केल्या. एमसीसीसीतर्फे सोहनने 3 तर मयुरने 2 गडी बाद केले. एमसीसीसी संघाने 20 षटकांत 6 बाद 125 धावाच केल्या. प्रथम कुरणेने 61 धावा केल्या. विजया सीसीतर्फे स्वाती भाटी हिने 2 गडी बाद केले.
तिसऱया सामन्यात एमसीसीसी संघाने 20 षटकात सर्व बाद 156 धावा केल्या. प्रथम कुरणेने 88 तर शादाबने 11 धावा केल्या. निनातर्फे रोहन खानने 2, जोयाने 1 गडी बाद केला. त्यानंतर निनाने 20 षटकात 6 बाद 156 धावाच केल्याने हा सामना टाय झाला. निनातर्फे अभिनव के ने 59 तर श्रेयदने 22 धावा केल्या. एमसीसीसीतर्फे अब्दुलने 2 तर प्रथमने 1 गडी बाद केला.
चौथ्या सामन्यात युनियन जिमखाना रेडने 20 षटकात 3 बाद 227 धावा केल्या. शुभम खोतने 93 तर सुमित भोसलेने 69 धावा केल्या. एआर टू स्क्वेअरतर्फे नमनने 2, समिक्षाने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल एआर टू स्क्वेअरने 20 षटकात 7 गडी बाद 86 धावाच केल्या.